सध्या रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या अकरा हजारांवर पोहोचल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सुरुवातीला पनवेल, उरण या मुंबईपासून लागून असलेल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. परंतु, हळूहळू जूनपासून लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात केल्यापासून रायगडच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला. त्यातून सध्याचे लॉकडाऊन लादावे लागले आहे. अर्थात, सध्याच्या स्थितीत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय काही अन्य पर्यायही नाही. कोरोनाला ज्या विविध उपायांद्वारे आपण नियंत्रणात आणू शकतो, त्यातला लॉकडाऊन हा एक उपाय आहे. त्यानुसार सध्या रविवारपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. बुधवारी अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात जिल्हा प्रशासन व गावकरी यांच्यात तणाव निर्माण झाला. यात कोण चूक, कोण बरोबर, हे जाणून घेण्यापेक्षा प्रशासन नेहमी आंदोलकर्त्यांवर जशी दंडेलशाही करते, तशी न करता गोडीगुलाबीने हा प्रश्‍न हाताळला पाहिजे. त्यात आपल्याकडील जिल्हा प्रशासन कमी पडत आहे, हे निश्‍चित. वेळ पडल्यास जिल्हाधिकारी चौधरी मॅडमनी स्वत: जाऊन याप्रकरणी गावकर्‍यांशी बोलून त्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे. सध्या बोडणी गावात 72 रुग्ण आढळले आहेत व त्यामुळे गावात येण्या-जाण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तसेच गावातील लोकांना घरातच क्वॉरंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, गावकरी त्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे बुधवारी गावकर्‍यांची तपासणी करण्यासाठी पथक गेले असता त्यांना गावकर्‍यांकडून सहकार्य केले गेले नाही. शेवटी गावकरी व प्रशासन यांच्यात वादावादी झाली. परिणामी, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची पायमल्ली झाली. त्यामुळे तेथे बराच काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाचे शिस्त पाळण्यासाठी काही बाबतीत कडकपणे वागणे समजू शकतो; परंतु त्यांनी सध्याची परिस्थितीही लक्षात घेणे गरजेचे आहे. एक तर, सध्या गेले चार महिने लोक लॉकडाऊनमुळे हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात त्यांच्या खाण्यासाठी काही उरलेले नाही. तसेच रोजगारही गेल्याने मानसिक तणावाखाली लोक आहेत. जून महिन्यात आलेल्या चक्रीवादळामुळे बर्‍याच जणांचे बागायती, घरांचे नुकसान झालेले आहे. त्याची नुकसानभरपाई दिली न गेल्याने प्रशासनावरचा विश्‍वास उडालेला आहे. अशा स्थितीत आपण मेलेले बरे; परंतु हे लॉकडाऊन नको, अशी मानसिक स्थिती गावकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ दंडुकेशाहीने या गावचा प्रश्‍न सोडविता कामा नये. त्यासाठी गावकर्‍यांशी गोडीगुलाबीने घेत हा प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. बोडणीच्या गावकर्‍यांचे जे प्रश्‍न आहोत, त्यांच्या मनात काही शंका असल्यास त्यांचे निरसन करुन त्यांना आश्‍वस्त केले पाहिजे. ज्यांच्याकडे घरात धान्य नाही, त्यांना घरपोच धान्य पोहोचविण्याची जबाबदारी प्रसासनाने घेतली पाहिजे. एकदा का लोकांना दोन वेळच्या जेवणाची निश्‍चिती होईल, त्यानंतर ते प्रशासनाचे ऐकण्यास तयार होतील. कारण, सध्या त्यांची लढाई ही जीवनमरणाची सुरु आहे. आमचे रिपोर्ट खोटे पॉझिटिव्ह दाखविले जात आहेत, ही गावकर्‍यांची शंका दूर करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व प्रामुख्याने जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनची आहे. गावकर्‍यांच्या शंकांचे निरसन न करताच त्यांच्याशी उद्दामपणाने वागल्यास लोकांमध्ये आणखीनच नाराजी निर्माण होणार आहे व त्यातून प्रशासनाच्या विरोधात जनमत आणखीनच बळकट होईल. बोडणी गावात प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी करणे कसे गरजेचे आहे, त्याचा त्यांना फायदा काय? हे पटवून सांगितल्यास गावकरी त्याला नकार देणार नाहीत. परंतु, प्रशासनाने हे सर्व समजूतदारपणाने करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील धारवीसारख्या एवढ्या मोठ्या झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगपालिका, पोलिसांच्या टीमने ज्या प्रकारे प्रयत्न केले, ते वाखाणण्याजोगे आहे. तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने बोडणीतील गावकर्‍यांना समजावून सांगून त्यांच्यात विश्‍वास निर्माण केल्यास गावकरी निश्‍चित सहकार्य करतील. त्याकामी पालकमंत्र्यांनीही विशेष प्रयत्न केले पाहिजेत. अशा अवघड प्रश्‍नांची उकल करण्यात पालकमंत्र्यांची नेहमी कसोटी लागते. बोडणी गावातील हा तणाव वाढू न देता त्यावर तातडीने सामंजस्याने उपाय शोधण्याची गरज आहे. येत्या काही काळात जसा कोरोना वाढत जाईल, तसे तणाव हे वाढत जाणार आहेत. कारण, लोक कोरोनाला व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना कंटाळले आहेत. त्यांना त्यांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे, त्यामुळे त्यांची चिडचिड वाढत जाणे स्वाभाविक आहे. लोकांच्या या तणावाच्या स्थितीत शांततेत घेत हे प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत. लवकरच आता गणपती उत्सव येत आहे, त्यामुळे चाकरमानी आपल्या गावात परततील. त्यांना अगोदर क्वॉरंटाईन करुन मगच गावात घेण्याचे ठरले असले तरी त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होणे, ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असणार आहे. आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी हे त्यांना करावेच लागणार आहे. यात जरा जरी कसूर झाली, तर कोरोना वाढण्याचा धोका वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी समजून कोरोनाशी लढा देताना नियमांचे पालन करावयाचे आहे. प्रशासन त्यासंबंधी मार्गदर्शन करु शकते. मात्र, कोरोना पसरु नये यासाठी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांची अंमलबजावणी ही प्रत्येकाने आपले कर्त्यव्य समजून पार पाडली पाहिजे. रायगड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अकरा हजारांवर गेली असली तरी बरे झालेले रुग्ण हे साडेसात हजारांच्यावर आहेत, ही फार सकारात्मक बाजू आहे. त्यामुळे साडेतीन हजारच रुग्ण आहेत. प्रशासन, जनता यांच्यात उत्तम संवाद असल्यास ही संख्या शून्यावर येऊ शकते.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन