देशातील लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. अर्थात, केंद्राचे हे अपेक्षित असेच पाऊल होते. कारण, एकीकडे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला, तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याचा प्रसार थांबविणे हे पहिले पाऊल ठरते. त्यासाठी लॉकडाऊन करणे भागच आहे. आपल्याकडे आता देशात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या नगण्य असली, तरीही त्यात दररोज जी भर पडत आहे, ती सर्वात चिंतेची बाब ठरावी. ज्यावेळी कोरोनाग्रस्तांच्या संख्येला आळा बसेल व त्याची संख्या दररोज घटत जाईल, त्यावेळी आपण त्यावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, असे म्हणता येईल. यावेळचा हा चौथा लॉकडाऊन संपल्यावर आपल्याकडे लॉकडाऊन सुरु होऊन तब्बल 67 दिवस पूर्ण होतील. एवढे दिवस देशातील जनतेला घरी बसविणे, हे काही योग्य नव्हे. देशाचे सर्व अर्थचक्रच थांबल्यासारखे झाले आहे. परंतु, त्याशिवाय दुसरा काही उपायही नाही. तिसर्‍या लॉकडाऊनपासून सरकारने रेड झोनवगळता अन्य विभागात विविध उद्योग सुरु केले आहेत. परंतु, आज महानगरे ही देशाची कणा आहे व तेथील उलाढाल ही शेवटी महत्त्वाची ठरते. मात्र, देशातील 80 टक्के रुग्ण हे महानगरातच असल्याने अनेक महानगरांना टाळे लावणे भाग पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि अखेर तो ङ्गपब्लिसिटी स्टंटफच ठरला. यातून फारसे काही कोणाच्या हातात पडणार नाही व केवळ आकड्यांचा खेळच असल्याचे आता उघड होत आहे. सरकारने जी.डी.पी.च्या दहा टक्के पॅकेज जाहीर केल्याचे म्हटले होते. परंतु, नव्याने दिलेल्या सवलती केवळ 0.34 टक्केच आहेत, असा अहवाल ङ्गबर्लक्लेजफ या विदेशी सल्लागार कंपनीने दिला आहे. त्यामुळे सरकार जनतेची किती दिशाभूल करीत आहे, ते यावरुन उघड होते. सरकारने पहिला लॉकडाऊन 24 मार्चपासून सुरु केला, त्यापूर्वी एक दिवसाचा 22 मार्च रोजी बंद पाळण्यात आला. पहिल्या लॉकडाऊननंतर देशावरचे हे संकट आटपेल व आपण कामावर जाऊ, अशी जनतेची कल्पना होती. परंतु, तसे होणे काही शक्य नाही. कारण, कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खरे तर, सरकारने लॉकडाऊन सुरु करण्यास विलंब केला. आज त्याविषयी मौन पाळले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यात सरकारला कोरोनावर उपाययोजना करण्याचा इशारा दिला होता. परंतु, राहुल गांधींचा इशारा ऐकण्याची आवश्यकता सरकारला वाटली नाही. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत सरकारला इशारा दिला होता. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. आपल्याकडे जर फेब्रुवारी महिन्यापासून विदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची छाननी करुन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असते, तर सध्याच्या लॉकडाऊनची परिस्थिती देशावर आली नसती. परंतु, सध्याचे सरकार आपल्या चुका मान्यही करीत नाही व चुका दाखविणार्‍याची निंदानालस्ती करते. जनतेने आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे, मग पाच वर्षे आम्ही काय करायचे ते ठरवू, अशी त्यांची मानसिकता आहे. चीनमधील ज्या वुहान प्रांतातून कोरोना सुरु झाला, त्या शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी 80 दिवस लागले. चीनने अनेकदा कडक शिस्तीचा बडगा दाखवित लॉकडाऊन अंमलात आणल्यामुळे ते शक्य झाले. आपल्याकडे असलेली परिस्थिती व लॉकडाऊन प्रभावी न होण्याची कारणे हे पाहता आपल्याला अजून काही काळ लॉकडाऊन वाढविण्याची पाळी आल्यास आश्‍चर्य वाटू नये. त्याचबरोबर ज्या विभागात व्यवहार सुरु झाले आहेत, तेथे कोरोना पसरणार नाही, याची दक्षता घेणे हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याकडे नांदेड हा जिल्हा सुरुवातीला बराच काळ कोरोनामुक्त होता, मात्र आता तेथेही झपाट्याने कोरोना वाढत आहे. अशा घटना चिंतादायक म्हटल्या पाहिजेत. गोव्यासारखे आपल्या शेजारी असलेले छोटे राज्य अगदी अलीकडेपर्यंत कोरोनामुक्त होते. मात्र, आता तेथेही शिरकाव झाला असून, चार दिवसांत 22 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे जिकडे कोरोना नाही आहे, तेथे तो पसरणे धोकादायक आहे. रायगड जिल्ह्यातही सुरुवातीला कोरोना फक्त पनवेल शहरात होता, त्यानंतर उरणमध्ये कोरोना वाढू लागला. आता त्याचे अस्तित्व अलिबाग, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व आता माणगाव या तालुक्यात आहे. येथील रुग्णसंख्या मर्यादित असली, तरी ती वाढण्यास काही वेळ लागत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरीही त्यातून बरे होणारेही मोठ्या संख्येने आहेत, तसेच त्यातून मृत्यूचे प्रमाणही बर्‍याच प्रकारे मर्यादित आहे. हीच एक समाधानाची बाब म्हटली पाहिजे. सरकारने अजूनही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, गर्दी होईल अशा ठिकाणी खरेदी करण्यास बंदी घातली आहे. अर्थातच, सरकारचे हे धोरण योग्यच आहे. अजूनही आपल्याला कोरोनाची लढाई प्रदीर्घ काळ द्यावी लागणार आहे, असेच सध्यातरी दिसते. जगात आता चीन, इटली, स्पेन, इराण, जर्मनी या देशातील साथ बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र, अजूनही अमेरिका, ब्रिटन, रशिया व भारत हे हॉटस्पॉट आहेत. त्यातील अमेरिकेने दाखविलेल्या मस्तीमुळे, ब्रिटन व रशियातील चुकीच्या धोरणांमुळे तेथे कोरोना पसरला आहे. भारतानेदेखील उपाययोजना करण्यास विलंब केल्यामुळे ही लॉकडाऊनची पाळी आली आहे.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!