राजकारण, सिनेसृष्टी व उद्योग क्षेत्रात सेटिंग करण्यात माहीर असलेल्या खासदार अमरसिंग यांचे दोन दिवसांपूर्वी सिंगापूर येथे निधन झाले आणि अमरसिंग नावाची एक गूढकथा संपली असेच म्हणावे लागेल. अमरसिंग हे या तीनही क्षेत्रात आपले वजन राखून होते. मात्र, आज त्यांच्या निधनानंतर प्रत्येक जण सावध प्रतिक्रिया देत आहे किंवा चूप्प बसला आहे. त्यामुळे अमरसिंग हे व्यक्तिमत्त्व एक खरोखरीच गूढकथेसारखेच होते, हे सिद्ध होते. तसे पाहता, गेले दोन-तीन वर्षे ते किडनीच्या रोगाने त्रस्त होते. त्यामुळे फारसे सक्रीय नव्हते. राजकारण, सिनेसृष्टी व उद्योग क्षेत्रात एकाच वेळी मुशाफिरी करणे, ही बाब काही सोपी नव्हती. आजपर्यंत यापैकी एकाच क्षेत्रात वावर असणारे तुम्हाला अनेक जण भेटतील; परंतु या तिन्ही क्षेत्रात वावर व दबदबा असणारे व्यक्तिमत्त्व हे अमरसिंग यांच्या रुपाने एकमेव होते, असेच म्हणावे लागेल. एकेकाळी चंद्रास्वामी हे असेच गूढ व्यक्तिमत्त्व राजकारण व उद्योग क्षेत्रात कार्यरत होते. परंतु, पी.व्ही. नरसिंगराव यांनी पंतप्रधान असताना चंद्रास्वामी यांना संपविले. मात्र, अमरसिंग हे व्यक्तिमत्त्व अशा प्रकारे कुणाला संपविता आले नाही, तर ते गंभीर आजारपणातूनच वयाच्या 64 व्या वर्षी काळाच्या ओघात लुप्त झालेे. उत्तर प्रदेशात आझमढ येथे जन्मलेले अमरसिंह यांचे सर्व शिक्षण पश्‍चिम बंगालमध्ये झाले. मात्र, त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने दिल्ली-मुंबई राहिले. आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांनी कॉँग्रेस पक्षापासून केली. मात्र, त्यांंच्यातील हुशारी व काम करण्याची क्षमता समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यांनी ओळखली व त्यांनी अमरसिंग यांना आपल्याकडे खेचले. त्यांनीच त्यांना समाजवादी पक्षातर्फे राज्यसभेवर सर्वात प्रथम पाठविले. त्याअगोदर ते मुलायमसिंग यांच्या एवढे जवळ आले होते की, पक्षाचा कोणताही निर्णय त्यांना सांगितल्याशिवाय घेतला जात नव्हता. एकीकडे राजकीय प्रभाव वाढवत असताना, त्यांनी उद्योग व सिनेसृष्टीत आपला संपर्क चांगलाच वाढविला. त्यांना मुळातच चित्रपटांची आवड होती व त्यातून त्यांनी दोन चित्रपटांत लहानशा भूमिकाही केल्या होत्या. परंतु, त्यांनी त्याकडे करिअर म्हणून कधीच पाहिले नाही. त्यापेक्षा त्यांनी अनेकांचे करिअर कसे घडवायेच किंवा बिघडवायचे, हे काम बेमालूमपणे केले. राजकारण, सिनेसृष्टी व उद्योग या क्षेत्रातील धुरिणांचे परस्परांशी काही ना काही कामाच्या निमित्ताने संपर्क येत असतात. परंतु, त्यांच्यातला एक भक्कम दुवा (याला एजंटही म्हणता येईल) म्हणून काम करण्याची भूमिका अमरसिंग यांनी उत्कृष्ट वठविली. त्यातून त्यांनी अनेकांना जोडून देऊन त्यांची कामे केली. अमिताभ बच्चन हे ए.बी.सी.एल. कोसळ्यावर पूर्णपणे संकटात सापडले होते. सिनेसृष्टीतल्या या बादशहावर करोडो रुपयांचे कर्जही झाले होते. अभिताभ यांच्या करिअरमधील तो सर्वात कठीण काळ होता. परंतु, हीच नेमकी वेळ साधून अमरसिंग यांनी त्यांच्याशी असलेल्या दोस्तीचा उपयोग करुन अमिताभ यातून कसे बाहेर पडतील यासाठी मदत केली. समाजवादी पक्षाच्या वतीने जया बच्चन यांना खासदारकी मिळवून देऊन बच्चन कुटुंबियांसाठी राज्यसभेचे दरवाजे उघडून दिले. मात्र, नंतरच्या काळात, म्हणजे अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या वेळी अमिताभ व अमरसिंग यांच्यात वितुष्ट निर्माण झाले व त्यांचा दोस्ताना तुटला. मध्यंतरी आजारी असताना अमरसिंग यांनी अमिताभ यांच्याशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते; परंतु अमिताभ यांंनी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. शेवटी अमरसिंग यांचे निधन झाल्यावर अमिताभ यांनी ट्विटदेखील केले नाही, त्यावरुन अमिताभ त्यांच्यावर किती नाराज होते, हे दिसते. सिनेसृष्टीतील एकेकाळची नामवंत अभिनेत्री जयाप्रदा हिलादेखील त्यांनीच समाजवादी पार्टीतर्फे राज्यसभा खासदार केले व तिच्या सहाय्याने या चंदेरी दुनियेतील अनेकांशी नाते जुळवले. जयाप्रदा हिचे चित्रपटातील करिअर संपले होतेच. तिला राजकारणात स्थान बळकट करण्याची इच्छा होतीच. अमरसिंग यांची जयाप्रदाशी जोडी अशी काही जमली, की अमरसिंग तेथे जयाप्रदा असे समीकरणच जुळले होते. अमरसिंग यांची अनिल अंबानी यांच्याशीही चांगली मैत्री होती. असे बोलले जात होते, की अंबानी कुटुंबात दोन भावंमध्ये मालमत्तेचे विभाजन झाल्यावर अनिल अंबांनी यांना भविष्यातील गुंतवणूक करण्याचा सल्ला अमरसिंगचे देत होते. त्यातूनच अनिल अंबानी यांनी उत्तर प्रदेशात महाकाय वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, त्यातील बहुतांश प्रकल्प फेल गेले व अनिल अंबानी रस्त्यावर आले. दोन वर्षांपूर्वी श्रीदेवीचे निधन झाल्यावर अमरसिंग प्रतिक्रिया देताना चॅनेलपुढे रडले होते. श्रीदेवी व तिचे पती बॉनी कपूर यांचे अमरसिंग यांचे घरचे नाते होते. राजकारण करताना कसे वावरायचे, चित्रपट सृष्टीत वावरताना आपल्या राजकीय ग्लॅमरचा वापर कसा करायचा व उद्योगक्षेत्रात फिरताना राजकीय लागेबांधे उलगडून उद्योजकांना कसे भुलवायचे, हे अमरसिंग यांंना बरोबर ठाऊक होते. यातून त्यांनी अनेकांचे भलेही केले व नुकसानही. मात्र, आपल्याभोवती या तिन्ही क्षेत्रातील वलय कसे कायम राहील, हे त्यांनी पाहिले. काहींसाठी अमरसिंग हे देवता ठरले, तर काहींसाठी रॅकेटर, एजंट. मुलायमसिंग यांच्या राजकीय शेवटच्या काळात त्यांच्याशी फाटले. तर, समाजवादी पक्षाची सूत्रे अखिलेश यादव यांच्याकडे आल्यावर त्यांचे पक्षात शून्य स्थान झाले. तरीदेखील त्यांनी आपली खासदारकी शेवटपर्यंत टिकवली. अमरसिंग यांच्या निधनामुळे अनेक रहस्ये, गुपिते काळाच्या ओघात लुप्त झाली आहेत. त्यांनी आपली सर्व मालमत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दान केली. त्यावरुन ते संघाचे असावेत, असा दाट संशय यावा. पण, त्यांनी तसे कधीही भासवू दिले नाही. शेवटी अमरसिंग हे व्यक्तिमत्त्व गूढच होते व शेवटपर्यंत राहिले.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद