दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन संपायला अजून एक आठवडा शिल्लक असताना लोकांची चलबिचल सुरु झाली आहे. अनेकांना असे ठाम वाटते की, लॉकडाऊन आता उठविले जाईल. परंतु, सध्या जी आकडेवारी प्रसिद्ध होत आहे; ती पाहता, लॉकडाऊन उठणे अशक्य दिसते. तसेच घाईघाई करुन उठविणेही धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा अतिशय संवेदनाक्षम असला, तरी मोठा कसोटीचा आहे. संदेनाक्षम यासाठी, की लोक आता घरी बसून कंटाळले आहेत, जे मजूर परगावातले आहेत व ज्यांना घरी जाता आलेले नाही, ते घरी जाण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यातील चलबिचल वाढली आहे. त्यांची स्थिती तर पारच वाईट आहे. ना रोजगार, ना पुरेसे अन्नधान्य खायला, अशा स्थितीत ते जीवन जगत आहेत. परंतु, अशा स्थितीतही सावधानगिरी बाळगली जाणे गरजेची आहे. शनिवारची आकडेवारी पाहता, एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण, म्हणजे 811 सापडले आहेत. तसेच मुंबई, पुणे, अहमदाबाद यासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या शहरातील धोका वाढला आहे. मुंबईत धारावीसारख्या झोपडपट्टीत जिकडे लोकसंख्या घनदाट आहे, तिकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणे, हे सर्वात धोकादायक ठरणारे आहे. देशाची स्थिती पाहता, कोरोनाग्रस्तांची संख्या 25 हजारांवर पोहोचली आहे. त्यात पाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. आपल्या लोकसंख्येशी तुलना करता, हा आकडा नियंत्रणात आहे. म्हणजे, आपल्याला लॉकडाऊन केल्याचे अनेक फायदे मिळत आहेत; परंतु सध्याच्या काळात लोकांचा धीर सुटल्यामुळे हे लॉकडाऊन घाईघाईने उठविणेही शहाणपणाचे ठरणारे नाही. कारण, लॉकडाऊनमुळे प्रसार थांबतो, तसेच प्रशासनाला आरोग्यविषयी पर्यायी व्यवस्था करण्यास वेळ मिळतो. खरे तर, यापेक्षा स्थिती आपण चांगली राखू शकलो असतो, मात्र आपल्याकडे कोरोनासंबंधी गैरसमज व खोटी अपेक्षा तसेच लॉकडाऊनला केलेला विलंब यामुळे सध्याची स्थिती आली आहे. आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक जण छातीठोकपणे सांगत होते, की आपल्याकडील जीवनपद्धती, आहारशैली, वाढता उन्हाळा यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. मात्र, यासंबंधीचे त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कोरोना ज्या गतीने थंड असलेल्या स्वीत्झर्लंडसारख्या देशात फैलावला, त्याच गतीने आपल्याकडे उन्हाळ्याचे दिवस असूनही पसरला आहे. आपण 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. विदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची तपासणी मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात सुरु केली. हे जर सर्व अगोदर एक महिना सुरु केले असते, तर त्याचा कोरोना नियंत्रणासाठी मोठा उपयोग झाला असता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या भारतीय संशोधन संस्थेने कोरोनाचा जागतिक पातळीवर धोका वाढू लागल्यावर भारतात कोणते उपाय योजले पाहिजेत, त्याचा एक विस्तृत अहवाल सादर केला होता. यात त्यांनी जे स्थलांतरित मजूर आहेत, त्यांना सर्वात प्रथम त्यांच्या गावी सोडणे, तसेच अन्नपाण्याची व्यवस्था सुरळीत ठेवणे, याबाबी अगोदर पाहून लॉकडाऊनच सुरु करावे, असे म्हटले होते. मात्र, मोदीसाहेबांनी लॉकडाऊन करताना या कोणत्याही बाबींचा विचार केलेला नाही. आपल्याकडे देशात असलेल्या 417 जिल्ह्यांत कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे, तसेच 15 कोटी मजुरांना त्यांच्या घरी सोडल्यावर त्यांची अन्नपाण्याची कशी व्यवस्था करावी, याचा तयार केलेल्या कौन्सिलच्या आलेखाचा विचारच झाला नाही. त्याचबरोबर पंतप्रधानांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना तसेच सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी विचारविनियम करुन निर्णय घेणे गरजेचे होते. तसे काहीही न करता अचानकपणे 22 मार्चचा एक दिवसाचा बंद व त्यानंतर 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली. या त्यांच्या कृतीत एकाधिकारशाहीचे दर्शन झाले. राहुल गांधींनी 12 फेब्रुवारी रोजी मोदींना पत्र लिहून या रोगाच्या धोक्याचा इशारा दिला होता. मात्र, कोणत्याच विरोधी पक्षाचे एकायचे नाही, उलट त्यांची खिल्ली उडवायची, हे धोरण असल्याने राहुल गांधींचे हे पत्र विचारात घेतले गेले नाही. उलट, मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा तीन दिवसीय दौरा आटपून घेण्यात आला. त्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडून तेथे भाजपचे सरकार स्थापन केल्यावर लॉकडाऊनचे काम सुरु झाले. खरे तर, मेडिकल कौन्सिलच्या सल्ल्यानुसार, जर मोदींनी काम केले असते, तर सध्याची भीषण परिस्थिती उद्भवली नसती. कदाचित, लॉकडाऊन लवकर सुरु झाले असते, तर तीन-चार आठवड्यांत संपलेही असते व एवढ्यात जीवनमान पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरुही झाली असती. परंतु, आपल्या हातातून वेळ निघून जातेय असे दिसल्यावर लगेचच उपाययोजनांची घाई करण्यात आली आणि सध्याच्या कठीण काळातही टाळ्या, थाळ्या वाजविण्याचे व दिवे लावण्याचे इव्हेन्ट्स करण्यात आले. सध्याच्या स्थितीत केरळने उत्कृष्

अवश्य वाचा