अलिबाग 

बलात्काराच्या गुन्ह्यात अलिबाग जेलमध्ये अटक असलेल्या दोन कैद्यांनी जेलच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याला पकडण्यात यश आले असले तरी दुसरा कैदी हा फरार झाला आहे. फरार कैद्याला पकडण्यासाठी अलिबाग शहराच्या सीमेवर बंदोबस्त ठेवला असून शहरात ठिकठिकाणी पोलीस शोध घेत आहेत. अलिबाग जेलमधून कैदी पळून जाण्याची ही साधारण पाचवी ते सहावी घटना आहे. मात्र या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

अलिबाग तालुक्यात आणि कोलाड मध्ये घडलेल्या बलात्कार घटनेतील दोन कैदी हे अलिबाग शहरातील आंग्रे कालीन जेलमध्ये अटक होते. सदर जेलची भिंत ही दगडी काम केलेली असून साधारण 30 ते 40 फूट उंच अशीही भिंत आहे. आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अटक असलेल्या या दोन कैद्यांनी जेल पोलिसांची नजर चुकवून भिंतीवरून खाली उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अलिबाग गुन्ह्यातील अटक आरोपी यास पकडण्यात यश आले आहे. तर कोलाड गुन्ह्यातील आरोपी हा फरार आहे. तीस ते चाळीस फुटावरून उडी मारल्याने दोन्ही कैद्यांना मार बसलेला आहे.

जेलमधून कैदी फरार झाल्याची वार्ता कळताच अलिबाग पोलिसांनी शहरातील सर्व सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तर या फरार कैद्याचा तपास अलिबाग पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेने जेल पोलिसांची जेलमधील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!