पुणे 

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणार्‍या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत एक राजा बिनडोक आहे, असं आंबेडकर म्हणाले.

 सर्वोच्च न्यायालयानं नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उग्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठा समाजाच्या वतीनं 10 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजाने नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. त्या प्रश्‍नावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली.

 दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचं मला दिसतंय. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ङ्गआम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द कराफ, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपानं राज्यसभेवर कसे पाठवले? असा प्रश्‍न पडत आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

 पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले,काल मराठा आरक्षण समितीमधील सुरेश पाटील यांनी मला फोन करून, 10 तारखेच्या मोर्चा आणि बंदला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. त्या मागणीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पाठिंबा दर्शवला आहे. तसेच मराठा आरक्षण हे वेगळे असून, ओबीसी समाजाचे देखील आरक्षण वेगळे आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या राहतील, हे लक्षात घेऊन, ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी होणार नाही. याबाबतची दक्षता सुरेश पाटील यांनी घ्यावी, असं आंबेडकर म्हणाले. सध्याची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता, कुठे तरी सामंजस्य बिघडताना दिसत आहे. त्यावर मराठा समाज आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन्ही पक्ष ठामपणे राहिल्यास, राज्यातील सामंजस्य आणि शांततेचं वातावरण निश्‍चित राहिल, अशी असं आंबेडकर म्हणाले.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त