पुणे 

मकरोनाफचा अधिक प्रसार रोखण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या परिसरातील बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी परिसरातील एटीएम सुरू ठेवण्यात येणार आहेत. सध्या शहराच्या विविध भागांत कर्फ्यू लागू असल्याने निम्म्या शहरातील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

सध्या देशभर 21 दिवसांचा मलॉकडाउनफ सुरू असून, या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. बँकिंग ही सेवा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने देशभर बँका सुरू आहेत. मात्र, शहराच्या काही विशिष्ट भागात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन व पोलिसांनी तिथे कर्फ्यू जाहीर केला आहे. पुण्यातील पेठांचा काही भाग, कोंढवा तसेच सिंहगड रस्त्याच्या काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे इतर भागातील बँक कर्मचार्‍यांना तिथे पोहोचणे शक्य नसल्याने बँकांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस तसेच प्रशासनाशी चर्चा करून घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व बँकांची संघटना असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समिती अर्थात एसएलबीसीने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भागातील बँका 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. सर्व बँका या परिसरातील आपले एटीएम सुरू ठेवतील. तसेच, एटीएममध्ये दररोज पुरेशी रोकड असेल, याची दक्षता घेतली जाईल. बँकेच्या अन्य भागातील कर्मचार्‍यांना सील केलेल्या परिसरात येण्यास बंदी राहील.

बंदीमुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बँकांच्या विभागीय कार्यालयांनी ग्राहकांना एसएमएस, ई-मेल पाठवून जागृती करावी. त्यांना एटीएम तसेच ऑनलाइन बँकिंगच्या पर्यायांच्या वापराविषयी जागृत करावे. सील केलेल्या परिसरात राहणार्‍या बँक कर्मचार्‍यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासन, पोलिस यांच्या सूचनांचे पालन करावे, गरज भासल्यास विभागीय कार्यालय किंवा मुख्यालयाशी संपर्क साधावा, असेही एसएलबीसीने स्पष्ट केले आहे.

अवश्य वाचा