नाशिक

कोरोनाच्या संक्रमनामुळे द्राध उत्पादकांना करोडोंचा फटका सहन करावा लागत आहे. करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याने 14 एप्रिलनंतरही देशभरात लॉकडाऊन राहणार असल्याचे सूतोवाच सरकारकडून असल्याने थोडेफार पैसे पदरी पडतील, या आशेवर असलेल्या उत्पादकांच्या काळजात धस्स झालं आहे.

यंदा 30 ते 35 टक्के द्राक्षबागा अवकाळी पावसाने हातच्या गेल्या. त्याही परिस्थितीत महागडी औषधे वापरून द्राक्ष उत्पादकांनी हे पीक कसेबसे वाचविले. हंगाम सुरू झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान 25 ते 40 टक्के द्राक्षबागा एक्स्पोर्ट आणि लोकल मार्केटला गेल्या. आणि 30 ते 35 टक्के बागा आता करोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशा परिस्थितही काही उत्पादकांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन गृहीत धरून बाग हातात ठेवली आहे. बांगला देशातील व्यापारीही जिल्ह्यात आहेत. त्यामुळे 14 एप्रिलनंतर बागांचे खुडे सुरू होतील, ही आशा असणार्‍या उत्पादकांसामोर लॉकडाऊन वाढण्याच्या नुसत्या कल्पनेने अंधार दिसत आहेत. द्राक्षशेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे 20 एप्रिलपर्यंत असतो. त्यामुळे जवळपास 2040 कंटेनर व 28 हजार मेट्रिक टन निर्यातीचा फटका यावर्षी द्राक्ष उत्पादकांना बसला असल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.

सरकारने शेतीजन्य पदार्थ ट्रान्सपोर्टला परवानगी दिली असली तरी फक्त मोजकेच व्यापारी त्यांच्या फार्मवर निर्यातीसाठी कार्यरत आहेत. रशियासाठी ही पॅकिंग मजूर नसल्याने अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे आता काहींनी द्राक्ष स्टोर करून ठेवायला सुरुवात केली आहे. तर काही बेदाणा करीत आहे. कंटेनर चालवणारे फक्त 30 टक्के ड्रायव्हर आहेत. त्यामुळे सरकारने सुविधा उपलब्ध करूनही सध्या उपयोग नाही. काही बागाईतदारांनी पट्टी पेडवर माल पाठविला तर त्याला फक्त 8 ते 9 रुपये किलो भाव मिळत आहे.

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी बँक सोसायट्यांकडून कर्ज काढून बागा उभ्या केल्या आहेत. अवकाळी पाऊस, मार्केटमधील दरात चढउतार ही संकटे तीन वर्षांपासून सोसणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी तर भयावह परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. कर्जफेड, कौटुंबीक गरजा यासह परदेशात शिक्षणासाठी धाडलेले मुले या सर्वांची चिंता असून, अर्थचक्र कोलमडणार असून यापुढे द्राक्षबागा लावण्याची किंवा पीक घेण्याची हिंमत कोणी करणार नाही. त्यापेक्षा दर तीन महिन्यांनी घेता येणार्‍या कांदा पीकाकडे वळालेले बरे, असाही विचार आता काही शेतकरी करीत आहेत.

अशाही परिस्थितीत द्राक्ष उत्पादक घरपोहोच व बाजारात द्राक्ष विकण्याच्या तयारीत आहेत. पण द्राक्ष खाल्ले की खोकला येतो आणि डॉक्टरांकडे गेले की खोकला दिसताच डॉक्टर करोनाच्या संशयाने पहायला लागतात. त्यामुळे द्राक्ष खाणारेही सध्या भीत असल्याने 40 ते 50 रुपये किलोचे द्राक्ष 10 ते 15 रुपये किलो देऊनही कोणी खरेदी करायला पुढे येत नाही.

 

अवश्य वाचा