भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा गेले काही दिवस विविध विषयांमुळे चर्चेत आहे. रोहित आपल्या मुलीसोबत खेळतानाचा व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. त्याआधी भारताचे तीन सलामीवीर एकत्र एका लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसले. मयंक अग्रवालच्या लाईव्ह चॅट शो मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे सहभागी झाले. त्यावेळीही रोहितबद्दल चाहत्यांना अनेक मजेशीर गोष्टी समजल्या. याशिवाय युवराज सिंगने लाइव्ह चॅटमध्ये चुकून फिरकीपटू युजवेंद्र चहलबद्दल जातीवाचक शब्द वापरला होता, तेव्हाही तो रोहितशीच संवाद साधत होता. त्या घटनेनंतर युवराजसोबतच काहींनी रोहितवरही टीका केली होती. पण आता मात्र रोहित एका चांगल्या गोष्टीमुळे चर्चेत आहे.

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा याने रोहितवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. रोहितला मैदानावर खेळताना बघायला मला खूप आवडतं. तो एक उत्तर क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळाची शैली अप्रतिम आहे. त्याच्या याच शैलीवर काहीवेळा मला इर्ष्या वाटते. रोहित जेव्हा क्रिकेट खेळत असतो तेव्हा त्याची फटकेबाजी ओढूनताणून आणल्यासारखी नसते. त्याने मारलेले फटके अत्यंत रूबाबदार वाटतात आणि त्याची खेळी समतोल असते. तसंच त्याच्याकडे नेतृत्वकौशल्यही आहे.आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी तो अगदी शोभून दिसतो, कारण माझ्या मते तो एक उत्तम कर्णधार आहे, अशा भावना कुमार संगकाराने व्यक्त केल्या.

दरम्यान, भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसी चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची नावं पाठवत असते. 2019 विश्‍वचषकात 5 शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!