मुंबई

कोव्हिड-19 मुळे 3 महिन्यांचा लॉकडाऊन झाल्यानंतर सराव सुरु करण्याबाबत शासनाने दिशानिर्देश द्यावेत, अशी विनंती मुंबई क्रिकेट संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तूर्तास, शार्दुल ठाकुरसारख्या काही खेळाडूंनी पालघरमध्ये गोलंदाजीचा सराव केला असून राष्ट्रीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने अलीकडेच ट्रेनर निक वेबच्या जिम रुटीनप्रमाणे हलक्या सरावाला सुरुवात केली आहे.

राज्य संघटनेच्या नात्याने आम्ही सरकारचे सर्व दिशानिर्देश, सूचनांचे पालन करत आलो आहोत आणि भविष्यातही आमची वाटचाल याच पद्धतीने सुरु राहील. याचवेळी, हजारो क्रिकेटपटू खेळाला सुरुवात होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अर्थात, या विषाणूच्या सोबत राहण्याची सवय करुन घ्यावी लागेल, अशीच सध्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर, प्रशासनाने खेळाडूंसाठी दिशानिर्देश द्यावेतफ, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी संजय नाईक व संयुक्त सचिव शाहलाम शेख यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केले.