मुंबई

 शेकडो शरीरसौष्ठवपटूंना घडविणार्‍या मातृछाया व्यायामशाळेचे सर्वेसर्वा, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे खरेखुरे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आणि शरीरसौष्ठवाचे भाई असलेले सत्यवान उर्फ भाई कदम यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, 3 मुली, सून आणि नातवंडं असा परिवार आहे.

मुंबईतील शरीरसौष्ठवाला भारतातील सर्वात शक्तिशाली संघटना बनविण्याचे कौशल्य दाखविण्याची किमया भाई यांच्याच अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने करून दाखविली. भाईंनी शरीरसौष्ठवाची चळवळ उभारल्यामुळे आणि तरूणाईला फिटनेसचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिल्यामुळेच मुंबईत मोठ्या संख्येने व्यायामशाळांची निर्मिती होऊ लागली. त्यांच्या या कार्यामुळे शरीरसौष्ठवात त्यांचा दराराच नव्हता तर त्यांचे शब्दही अंतिम मानले जायचे. आपले अवघे आयुष्य शरीरसौष्ठव खेळाच्या प्रचार, प्रसार आणि प्रगतीसाठी समर्पित करणारे भाई स्वत: एक पीळदार देहयष्टीचे शरीरसौष्ठवपटू होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावले. तसेच त्यांनी 60च्या दशकांत भारत श्री हा बहुमानही संपादन केला होता.

मुंबई शरीरसौष्ठवाची सुत्रे एकहाती सांभाळणार्‍या भाईंनी 1971 साली दादर कबुतरखान्याशेजारी मातृछाया व्यायामशाळा सुरू केली. ही नुसती व्यायामशाळा नव्हती तर राष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठवपटूंच्या निर्मितीचा कारखाना होता. या कारखान्यातून मधुकर थोरात, शाम रहाटे, विकी गोरक्ष, मोहनसिंग गुरखा, विनय दलाल, भाऊ गुजर, वॉल्टर फर्नांडिस, प्रकाश गव्हाणे, प्रविण गणवीरसारखे हीरे शरीरसौष्ठव खेळाला सापडले. भाईंकडे शरीरसौष्ठवाचे अफाट ज्ञान आणि माहिती असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शेकडो खेळाडू त्यांच्याकडे यायचे. तसेच अनेक ठिकाणी ते स्वत: मार्गदर्शन शिबीरे घ्यायचे. शरीरसौष्ठवात असंख्य खेळाडू घडविल्याबद्दल राज्यशासनाने 1991 साली दादोजी कोंडदेव राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले होते. मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष असलेल्या भाईंच्या नेतृत्वाखालीच अनेक जागतीक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्पर्धांचे आयोजन मुंबईत केले गेले.

 

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ