ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या टी-20 विश्‍वचषकाचं भवितव्य अजुनही अधांतरीच आहे. गुरुवारी आयसीसीच्या बैठकीत टी-20 विश्‍वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेतला जाणार होता. मात्र आयसीसीने आजच्या बैठकीत आयोजनाबद्दलचा निर्णय 10 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. विश्‍वचषकाच्या आयोजनबद्दल आणखी कोणते पर्याय वापरता येऊ शकतील याबद्दल आयसीसीचे अधिकारी अधिक चर्चा करणार असल्याचं, आयसीसी प्रवक्त्याने सांगितलं. त्यामुळे टी-20 विश्‍वचषकाच्या आयोजनाबद्दलचा निर्णय आता जून महिन्यात घेतला जाणार आहे.

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियात 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यात अनेक देश प्रेक्षकांविना विश्‍वचषकासारखी स्पर्धा खेळण्यासाठी तयार नाहीयेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा रद्द होऊन पुढे ढकलली जाईल अशी चर्चा होती. मात्र आयसीसीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं समजतंय. टी-20 विश्‍वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय या जागेवर आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्याच्या विचारात होती. मात्र आयीसीने बैठक पुढे ढकलल्यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं भवितव्यही अजुन अधांतरीच आहे.