मुंबई

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत काँग्रेसने 2 उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेसने 1 जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात रविवारी मुंबईत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची जवळपास तासभर बैठक चालली या बैठकीत हा निर्णय झाला.

 संख्याबळ नसतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. कोरोनाच्या संकटकाळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील असताना काँग्रेसनं परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. महाराष्ट्र करोनाचा सामना करत असताना निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं होतं. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांचीही तीच इच्छा होती.

 येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक पक्षानं संख्याबळानुसार उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. भाजपने संख्याबळानुसार 4 उमेदवार दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने प्रत्येकी 2 उमेदवार दिले. काँग्रेसने मात्र 1 उमेदवार देण्याऐवजी दोन उमेदवार जाहीर केले होते. यामुळे निवडणुकीत मतदान होण्याची शक्यता होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसची मनधरणी केल्यानंतर काँग्रेसने 1 जागा लढवण्याचा निर्णय घेत माघार घेतलीय.

 महाविकास आघाडीतील विधानपरिषदेच्या जागांचा तिढा सुटलेला आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!