मुंबई 

भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.

या उमेदवारीनंतर भाजपात आता पुन्हा अंतर्गत धुसफूस पुढे येण्याची शक्यता आहे. कारण, विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच वरिष्ठांकडे इच्छा बोलून दाखवली होती. तर त्यांचं नाव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचंही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. एकनाथ खडसेंना विधानसभेतही तिकीट नाकारण्यात आलं होतं. आता पुन्हा विधानपरिषदेलाही त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

दुसरीकडे विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे अशी अनेक नावे भाजपात आहेत. विनोद तावडे आणि बावनकुळे यांना विधानसभेला उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेतले जाईल, असा अंदाज लावला जात होता.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे नवव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चुरस आहे. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीपेक्षा कमी मतांची गरज आहे. मतदान गुप्त असल्याने भाजप चौथी जागा लढविण्यावर ठाम असून आम्हाला चार जागा सोडल्या तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपनेत्यांचे मत आहे. यानुसार भाजपने चार उमेदवारीही जाहीर केल्याने चुरस वाढणार हे मात्र निश्‍चित झालं आहे.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!