मुंबई,

 राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी चर्चा करण्याचं आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिलं आहे. त्यामुळे सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

 काँग्रेसला सरकारमध्ये मिळत असलेलं दुय्यम स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांचे वाटप यावर चर्चा होणार आहे. दरम्यान काल रात्री काँग्रेसचे मंत्री सुनिल केदार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट त्यांच्या खात्यातील काही विषयासंदर्भात होती. काँग्रेसच्या विषयाबाबत सुनिल केदार मुख्यमंत्र्यांना भेटले नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

 महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली. महाविकासआघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत.