Tuesday, April 13, 2021 | 01:00 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राज्यात ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती चिंताजनक
मुंबई
06-Apr-2021 08:07 PM

मुंबई

मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून करोना रुग्णांसाठी लागणार्‍या ऑक्सिजनचा पुरवठा आगामी काळात कसा करायचा? हे एक आव्हान बनले आहे. करोना रुग्णांना सध्या दररोज 777 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन लागत असून पुढील दोन आठवड्यात वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील ऑक्सिजनचा साठा अपुरा ठरणार आहे. परिणामी जादा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देण्याकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विनंती करण्यात आली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात राज्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून 1080 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. तेव्हा करोना रुग्णांना साधारण रोज 600 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या एकूण उत्पादनातील 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय तर 20 टक्के औद्योगिक वापरासाठी देता येईल, असे आदेश शासनाने जारी केले होते.

सप्टेंबर 2020 मध्ये राज्यात एकूण 56 हजार 297 ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत्या. आता करोनाची दुसरी लाट आली असून राज्यात तब्बल 62 हजार 304 ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या दिवशी 17 हजार 317 रुग्ण या ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत आहेत. हे प्रमाण एकूण खाटांच्या 27.79 टक्के असून येत्या पंधरा दिवसात यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात सध्या 1100 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत असून यातील करोना रुग्णांसाठीचा वापर 777 मेट्रिक टन प्रतिदिन एवढा आहे. राज्यात एकूण 65 ऑक्सिजन भरणा केंद्र असून राज्यात ऑक्सिजन साठवणूक करणार्‍या विविध टँकची क्षमता 7000 मेट्रिक टन साठवणुकीची आहे. आरोग्य विभागाअंतर्गत शासकीय व पालिका रुग्णालयात मिळून 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. मात्र राज्यातील विविध कंपन्यांची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1100 मेट्रिक टन व रोजचा वापर 777 मेट्रिक टन वापर लक्षात घेता आता अन्य राज्यांकडून ऑक्सिजन पुरवठा मिळणे गरजेचे आहे असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी करण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सप्टेंबर 2020 मध्ये ऑक्सिजनचा होणारा अतिरिक्त वापर तसेच गळती याची माहिती घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय समिती नियुक्त केली होती. तेव्हा प्रत्येक महसुली विभागात 50 ड्युरा सिलिंडर व 200 जम्बो सिलिंडरचा राखीव साठा ठेवण्यास विभागीय आयुक्तांना सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराची माहिती गोळा करण्याबरोबरच ऑक्सिजनची गळती वा अन्य कोणत्या कारणांमुळे ऑक्सिजन वाया जात नाही ना, याची काटेकोर काळजी घेण्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top