मुंबई
। मुंबई । वृत्तसंस्था ।
शहर आणि उपनगरात कमाल तापमानात मंगळवारी पुन्हा एक अंशाची वाढ झाली. त्यामुळे सलग तिसर्या दिवशी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागला.शनिवारपासून कमाल तापमानात वाढ होत आहे. सांताक्रूझ केंद्रावर 35.3 अंश, तर कुलाबा केंद्रावर 32.2 अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. गेल्या दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाच्या नोंदी या महिन्याच्या शेवटच्या आठवडयातील आहेत. तुलनेने महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात तापमान वाढीच्या नोंदी कमी आहेत. मुंबईच्या कमाल तापमानातील नोंदी तीन ते चार अंशाने अधिक असून, किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशाने अधिक आहे.गेल्या आठवडयातील अतिवाईट हवेच्या तुलनेत या आठवडयात प्रदूषण कमी झाले आहे. सोमवारी हवेची गुणवत्ता मोजण्याच्या आठपैकी दोन केंद्रांवर गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट, तीन ठिकाणी वाईट आणि उर्वरीत ठिकाणी मध्यम स्तरावर राहिला.