गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून अखेर गुरुवारी एसटी बस रवाना झाल्या. 12 ऑगस्टपर्यंत 400 बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या असून, आतापर्यंत तीन हजार प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. दहा दिवसांच्या विलगीकरणासाठी 12 ऑगस्टपूर्वी पोहचण्याचा अनेकांचा प्रयत्न असून त्यासाठी आरक्षणाची धडपड सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे 5 ऑगस्टला कोकणात रवाना होऊ न शकलेल्या बससह एकूण 22 बस गुरुवारी सुटल्या. पहिली एसटी कुर्ला नेहरूनगर आगारातून 22 प्रवाशांना घेऊन मालवणसाठी रवाना झाली. सर्वाधिक आरक्षण 10 व 11 ऑगस्टसाठी झाले असून, दोन दिवसांत 150 बस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने कोकणात जाणार्‍यांसाठी 10 दिवस विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहोचावे लागेल. 12 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत जे पोहोचतील त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. जे गणेशभक्त 12 तारखेनंतर जातील त्यांना 48 तासांपूर्वी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच कोकणात जाण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे अनेकांनी आरक्षणासाठी धडपड सुरू केली आहे.दरम्यान, गट आरक्षणालाही गुरुवारपासून सुरुवात झाली असून तीन बस आरक्षणासाठी नोंदविल्या गेल्या आहेत. 22 प्रवाशांचे एकेरी तिकीट काढून थेट त्यांच्या गावापर्यंत एसटी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 
 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही