मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कर्करोगाने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. गेल्यावर्षी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती.डॉ. देशमुख यांची 14 जानेवारी 2019 रोजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक ही पदेही त्यांनी भूषवली होती. इंग्रजी विषयात त्यांनी पीएच.डी केली होते. त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिवपद दीर्घकाळ रिक्त होते.

विद्यापीठासमोर अनेक आव्हाने असताना डॉ. देशमुख यांनी विद्यापीठाची धुरा सांभाळली. अवघ्या वर्षभराच्या कालावधीतही त्यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची घडी बसवली.  करोनाच्या प्रादुर्भावातही विद्यापीठातील अनेक प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.गेल्या महिन्याभरापासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.