मुंबई,

 कोव्हीड संकटाचा फायदा घेऊन  केंद्र सरकारने घाई घाईने चालू लोकसभा अधिवेशनात तीन कामगार कायद्यात बदल करणारे कामगार विरोधी सुधारणा विधेयक  बिल आणल्यामुळे कामगार वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे . कामगार व शेतकर्‍यांच्या कायद्यातील बदलला विरोध करण्यासाठी भारतातील प्रमुख सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी  बुधवारी  केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा  जाहीर निषेध म्हणून देशव्यापी आंदोलन केले.

महाराष्ट्रात देखील कामगार संघटना कृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने झाली.  हिंद मजदूर सभेशी संलग्न असणार्‍या पोर्ट, रेल्वे, एस. टी.,बेस्ट, मुंबई महानगर पालिका,  डिफेन्स, कोल इंडिया, इत्यादी उद्योगातील  सर्व कामगार संघटनानी  काळ्या फिती, निदर्शने, मोर्चा, मानवी साखळी काढून सुरक्षीत अंतर ठेवून आंदोलन केले. आज कामगारांनी आपली प्रचंड नाराजी व्यक्त करून आंदोलन केले. असे महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी सांगितले.

 कामगार कायद्यातील बदल, मेजर पोर्ट ऑथोरिटी बील मध्ये होणारा बदल याविरुद्ध  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व  ट्रान्स्पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन यांच्या  संयुक्त विद्यमाने  श्रमिक भवन , कर्नाक बंदर येथे गोदी कामगारांनी  प्रचंड निदर्शने केली.  त्यावेळेस महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे कार्याध्यक्ष  सुधाकर अपराज, खजिनदार निवृत्ती धुमाळ व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्सचे सचिव राजाराम शिंदे उपस्थित होते.  महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे व जनरल मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांच्यावतीने डोंबिवली, वागळे इस्टेट, ठाणे, तळोजा, नवी मुंबई, अशा विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने बांद्रा येथे आंदोलन झाले. एस.  टी. कामगारांनी विविध डेपोमध्ये निदर्शने केली. इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या कामगारांनी नाशिक येथे निदर्शने केली. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, इत्यादी शहरामध्ये कामगार संघटना कृती समितीतर्फे झालेल्या आंदोलनात हिंद मजदूर सभेचे कामगार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अवश्य वाचा