मुंबई
। मुंबई । वृत्तसंस्था ।
टाळेबंदीत झालेले कर्ज फेडण्यासाठी मुंबईतील एका तरुणाने बनावट नोटा छपाई सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मोहम्मद फकीयान अय्युब खान (35) याच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. संकेतस्थळांवर नोटा छपाईच्या चित्रफिती पाहून तरुणाने घरात बनावट नोटा छापल्याचे समजते.
माहूल परिसरातील एमएमआरडीएच्या वसाहतीत बनावट नोटा वटविण्याकरिता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 4ला खबर्यांकडून मिळाली होती. त्यानुसार कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने सापळा रचला. खान नोटा वटविण्यासाठी माहूल परिसरात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांना त्याच्याजवळ 55 हजार 450 रुपये मूल्य असलेल्या 657 बनावट नोटा सापडल्या. अधिक चौकशी केल्यावर चेंबूर येथील भाडयाच्या खोलीत नोटा छापत असल्याची माहिती खान याने पोलिसांना दिली. त्याने सांगितलेल्या घरातून पोलिसांनी तीन लाख 43 हजार 100 रुपये मूल्याच्या 3015 बनावट नोटा जप्त केल्या. तसेच नोटा छपाईसाठी वापरलेले प्रिंटर, कागदांचे संच, शाई, लॅमिनेटर, हिरव्या रंगाचे पेपर रोल, पारदर्शक डिंक आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.