मुंबई 

 मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.

 याबाबत मुंबईतील पत्रकारांच्या सांगण्यानुसार भंडारी हे मुंबईतल्या पत्रकारांना चाय बिस्कुट पत्रकार म्हणून हिणवत होते, थोडक्यात तुम्ही खरी पत्रकारिता करत नाही, ती आम्ही करतो असं ते डिवचत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. तसंच अत्यंत आक्रस्ताळ्या पद्धतीनं रिपोर्टिंग करताना रिपब्लिकचे पत्रकार अन्य पत्रकारांच्या कामात प्रचंड व्यत्यय आणत होते अशी चर्चाही मुंबईतल्या पत्रकारांच्या वर्तुळात होती. या सगळ्याचा उद्रेक गुरूवारी झाल्याचं बघायला मिळालं.

 व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रदीप भंडारी यांना धक्काबुक्की होताना दिसत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकही सुरु होती. पोलीस पोहोचण्याआधीच हा वाद सुरु झाला होता. वाद वाढल्यानंतर पोलीस आणि इतर सहकारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. एनडीटीव्हीच्या पत्रकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. एनडीटीव्हीच्या सौरभ गुप्ता यांनी समोरच्या बाजुनं शिवीगाळ व गैरवर्तणूक होत होती, परंतु एनडीटीव्हीच्या पत्रकारांनी परिस्थिती शांतपणे हाताळल्याचे म्हटलं आहे. तसंच, भंडारी यांनीच दाखवलेल्या व्हिडीओमध्येही ते स्पष्ट असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त