तब्बल 72 दिवसांच्या विरामानंतर मुंबई, नागपूर, ठाणे, पुण्यासह शहरी भागांतील निर्बंध आज, शुक्रवारपासून शिथिल होणार असून, सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतरही खरेदी करता येईल आणि थांबलेल्या अर्थचक्राला गती मिळेल. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांनंतर आजपासून जनजीवन पूर्ववत होण्यास सुरूवात होणार आहे.

मुंबईच्या रस्त्यावरून रिक्षा-टॅक्सीही शुक्रवारपासून धावू लागतील. त्याचबरोबर मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही. हळूहळू सारे व्यवहार सुरू होऊन आर्थिक गाडी रुळावर यावी, असा सरकारचा प्रयत्न आहे.केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने टाळेबंदी 30 जूनपर्यंत वाढविताना टाळेबंदीच्या  पाचव्या पर्वात निर्बंध शिथिल करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.  ङ्गपुन्हा सुरुवातफ (मिशन बिगीन अगेन) या नावाने मार्गदर्शक तत्त्वे सरकारने जाहीर केली होती. यासाठी तीन टप्प्यांमध्ये दुकाने, कार्यालये, रिक्षा-टॅक्सी सुरू करण्यात येणार आहेत. बुधवारपासून व्यायामशाळांना तसेच धावणे, सायकल चालवणे याला मुभा देण्यात आली  होती, पण निसर्गवादळाने या निर्णयाची अंमलबजावणी दोन दिवस पुढे गेली. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गुरुवारी काही सुधारणा केल्या.
राज्य सरकारने 23 मार्चपासून तर केंद्र सरकारने त्यानंतर दोन दिवसांनी टाळेबंदी लागू केली होती. तेव्हापासून मुंबई, ठाण्यासह अन्य शहरांमधील दुकाने (जीवनावश्यक वस्तू वगळता) बंदच होती. पुण्यात मात्र दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मुंबई, ठाण्यातही दुकाने काही काळ उघडी ठेवावी, ही मागणी सातत्याने करण्यात येत होती, पण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दुकाने बंदच ठेवण्यात आली.

अवश्य वाचा