मुंबई
आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास दिलेल्या संमती विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमएने) आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून ही अधिसूचना मागे न घेतल्यास 11 डिसेंबरला राज्यासह भारतभरात वैद्यकीय सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) मूत्ररोग, पोट आणि आतडयाच्या, दंतरोग, नेत्ररोगासह 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील शल्यतंत्र आणि शालाक्यतंत्र पदव्युत्तरांना स्वतंत्रपणे करण्याची परवानगी दिली आहे.
शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (अॅलोपॅथिक) नसून आयुर्वेदिक आहेत असा दावा सीसीआयएमने के ला आहे. संस्कृतोत्पन्न नावेदेखील दिलेली आहेत, असा आक्षेप आयएमएने घेतला आहे. अॅलोपॅथीमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासात साडेचार वर्षे शरीर रचनाशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, शरीरातील अनेकविध रासायनिक द्रव्यांचा आणि त्यांच्या क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र, शरीरातील अवयवांना आजार झाल्यावर त्यामध्ये निर्माण होणार्या विविध विकृती आणि बदल अभ्यासणारे शास्त्र अशा विषयांचा सखोल अभ्यास करतात. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासात तज्ज्ञ सर्जनच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्याच्या अनेक पद्धती, त्यातील कौशल्ये यांचा परिपूर्ण व सूक्ष्म अभ्यास आणि प्रात्यक्षिक अनुभव तीन वर्षे घेतात. त्यानंतर त्यांना एम.एस. ही पदवी मिळते, तर आयुर्वेदाच्या पदवीपूर्व अभ्यासात केवळ आयुर्वेदाचेच मूलभूत विषय शिकवले जातात. त्यामुळे आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे अतार्किक ठरेल असे मत आयएमएने मांडले आहे.