मुंबई 

कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे एप्रिल ते जून 2020 या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राला निम्म्या महसुलावर पाणी सोडावे लागले. पहिल्या तिमाहीत राज्याला 84 हजार कोटींचा महसूल अपेक्षित असताना प्रत्यक्षात सुमारे 42 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

राज्याच्या तिजोरीत वस्तू व सेवा कर, पेट्रोलियम पदार्थावरील विक्रीकर, मद्यावरील उत्पादन शुल्क अशा विविध माध्यमांतून महसूल जमा होतो. राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला तेव्हा दरमहा सुमारे 28 हजार कोटी रुपयांचा महसूल विविध करांतून मिळेल, असा अंदाज होता. त्या हिशेबाने एप्रिल ते जून 2020 या पहिल्या तिमाहीत 84 हजार कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. पण, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयात लागू झालेल्या टाळेबंदीमुळे जनजीवन-अर्थचक्र  थांबले. त्याचा मोठा परिणाम महसुलावर झाला असून, सुमारे 42 हजार कोटी रुपये म्हणजे निम्मेच उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जमा झाले.

गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 63 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत वस्तू व सेवा कर, पेट्रोलियम पदार्थावरील विक्रीकर, व्यवसाय कर यातून 39 हजार 724 कोटी रुपयांचा महसूल गोळा होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अवघे 16 हजार 445 कोटी रुपये जमा झाल्याने 23 हजार 279 कोटी रुपयांचा फटका बसला. उत्पादन शुल्कातून 4800 कोटींची अपेक्षा असताना अवघे 1250 कोटी रुपये जमा झाले. याशिवाय के ंद्रीय करातील वाटा, वस्तू व सेवा कराची भरपाई अशा माध्यमांतून राज्याला 19 हजार 900 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तो सुमारे 40 हजार कोटी रुपये अपेक्षित होता, असे समजते.

टाळेबंदीमुळे एप्रिल व मे महिन्यात जनजीवन ठप्प असल्याने व्यवहारांअभावी तिजोरीला हा फटका बसला. जूनच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र सरकारने जनजीवन व अर्थचक्राला गती देण्यासाठी ङ्गपुनश्‍च हरि ओमम या संकल्पनेसह टाळेबंदीतून शिथिलता दिली. त्यामुळे महसूल वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल व मे महिन्यात वस्तू व सेवा कर, इंधन विक्रीवरील कर आदींमधून एकू ण 8 हजार कोटी रुपयेच मिळाले होते.टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर एकटया जूनमध्ये त्यातून 8400 कोटी रुपये मिळाले. उत्पादन शुल्कातही 1250 कोटी रुपयांपैकी 850 कोटी रुपये एकटया जूनमध्ये मिळाले, असे आकडेवारीवरून दिसून येते.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद