मुंबई 

 आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे 15 जुलै-कबड्डी दिनापासून यंदा सुरु होणारा मुंबई शालेय सुपर लीग कबड्डीचा पाचवा हंगाम कोरोना प्रादुर्भावामुळे तहकूब करण्यात आला आहे. तरीसुध्दा शालेय खेळाडूंचा प्रतिसाद लक्षात घेऊन खेळासोबत अभ्यासाची आवड देखील निर्माण करण्यासाठी  कबड्डीवरील विविध विषयांवर ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 कबड्डी दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीच्या कबड्डीरत्न पुरस्काराचे यंदा मानकरी शालेय कबड्डी चळवळीत योगदान देणारे क्रीडा शिक्षक व कबड्डी मार्गदर्शक अविनाश महाडिक आणि माजी कबड्डीपटू, संघटक व मार्गदर्शक शेखर चव्हाण ठरले आहेत. रुपये पाच हजारसह मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, श्रीफळ असे कबड्डीरत्न पुरस्काराचे स्वरूप आहे.

  कबड्डी नियम व सरावाबाबतचा ऑनलाईन उपक्रम काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आला असून शालेय सुपर लीगचा उपक्रम करोनाचे संकट दूर झाल्यास त्वरित सुरु होणार असल्याचे प्रमुख संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी जाहीर केले आहे.  शालेय मुलामुलींसाठी कबड्डीवरील निबंध स्पर्धा विनाशुल्क असून स्पर्धेत 38 शाळांच्या 101 स्पर्धकांनी नोंद केली आहे. त्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अंतिम मुदत 14 जुलै सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. माझा आवडता खेळ कबड्डी, खेळा कबड्डी अभिमानाने, कबड्डीचा प्रवास आदी कोणत्याही एका विषयावर कमाल 150 शब्द मर्यादेत स्वतः लिहिलेल्या निबंध पानावर नांव, पत्ता, इयत्ता, जन्मदिन, मोबाईल नंबर व शाळेच्या नावांसह व्हॉट्स अ‍ॅपद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक 9004754507 यावर 14 जुलै, सायंकाळी 5.00 वा.पर्यंत पाठविणे. अन्य कोणत्याही मार्गाने निबंध पाठवू नये. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ए.बी.महाडिक (8850272639) यांच्याकडे संपर्क साधावा.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद