मुंबई 

करोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिसर्‍यांदा पत्रकार परिषद घेत रेपो दरात 0.40 टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. त्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जदारांची एचख मधून तात्पुरती सुटका होईल.

दरम्यान , करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. यात विविध क्षेत्रांना 20 लाख कोटींची मदत योजनांमधून केली होती. लॉकडाउनमुळे वस्तूंचा खप कमी झाला आहे. आता विक्रीला चालना देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या 3.2 टक्के निधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभर उद्योगांची दिवाळखोरी आणि नादारी विधेयकातून सुटका केली असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात 30 वर्षातील नीचांकी स्तरावर आहे.

आगामी काळात महागाई किती वाढेल याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र कृषी क्षेत्रासाठी आशेचा किरण आहे. यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याने कृषी क्षेत्राला फायदा होईल, असे दास यांनी सांगितले. आजच्या व्याजदर कपातीचा लाभ बँका ग्राहकांना देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

करोनावर मात करण्यासाठी लागू केलेलं हे लॉकडाऊन पुन्हा चौथ्यांदा वाढवण्यात आलं आहे. आता लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवल्यामुळे आरबीआयकडूनही कर्जदारांना दिलासा देण्यासाठी वसुलीला आणखी स्थगिती दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वीही तीन महिन्यांची स्थगिती दिली होती. तीन महिन्यांच्या मोरेटोरियममुळे कंपन्यांना 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कर्जाचा हफ्ता द्यावा लागणार नाही, असंही एसबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!