नवी मुंबई,

नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणार्‍या सर्व ठिकाणी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. एका आठवड्यासाठी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 29 जून ते 5 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. फक्त कंटेनमेंट झोनसाठी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापलिका आयुक्क तसंच पोलीस अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली.

 एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, बैठकीत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. अनेक ठिकाणी नागरिकांचीदेखील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी उपयायोजना केली पाहिजे अशी मागणी होती.

 नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंटेनमेंट झोनची यादी आणि निर्बंध जाहीर केले आहेत. आदेशात सांगण्यात आल्यानुसार, कंटेनमेंट झोन असणार्‍या सर्व ठिकाणी फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असणार आहे. कंटेनमेंट झोन असणार्‍या या ठिकाणी तसंच त्याच्याबाहेर लोकांनी संचार तसंच प्रवास करु नये यासाठी कठोरपणे नियमाची अमलबजावणी करावी असं सांगण्यात आलं आहे. वैद्यकीय आणीबाणी तसंच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा यांना यामधून सूट असणार आहे.