मुंबई
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाबाधितांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावलीचे काटेकोर पालन करीत मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी मतदान करण्यास परवानगी दिल्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7.30 पासून मतदान करता येईल, अशी माहिती श्री. मदान यांनी दिली.मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसर्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.