मुंबई 

 कोरोना काळात देशावर इंधन दरवाढीचं संकट गडद होत चालंलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनलॉक-1 नंतरही अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत.

 पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे. मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसूली करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसने सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली.

 पुण्यातही काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, पटणा, बंगळुरू आदी प्रमुख शहारांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरूवात झाली आहे.