यापूर्वी आरोग्य विभागाने वेळोवेळी समिती नेमून उपचारांच्या सुविधापासून करोनासाठीच्या वेगवेगळ्या चाचण्यांचे दर कमी केले आहेत. आता करोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने समिती नियुक्त केली असून लवकरच सिटी स्कॅनचे दर कमी होतील असा विश्‍वास आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज 22 ते 24 हजार नवीन रुग्ण सापडत असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या आता सव्वा दहा लाख झाली आहे. यातील बहुतेक करोना रुग्णांना  न्युमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना छातीचा सिटी स्कॅन काढण्यास डॉक्टर सांगतात. यासाठी येणारा खर्च मोठा असतो. असेही करोना रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांकडून रोज वेगवेगळ्या चाचण्या करण्यास सांगितले जाते. यात सिटी स्कॅनची चाचणी आवर्जून करण्यात येत असून खासगी लॅबमध्ये किंवा मोठ्या रुग्णालयात छातीच्या सिटी स्कॅन साठी अडीच हजार रुपये ते पाच हजार रुपये आकारले जातात.

गोरगरीब रुग्णांना हे दर परवडणारे नसून खरेतर छातीचा एक्स- रे काढल्यास त्यातही आजाराचे स्वरुप स्पष्ट होते असे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. खरंतर एक्स- रे मध्ये सारे स्पष्ट होत असूनही डॉक्टरांकडून आर्थिक कारणांसाठी सिटी स्कॅन काढायला सांगितले जाते असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही प्रकरणात सिटी स्कॅन आवश्यक असून करोना च्या कठीण काळाचा विचार करून सिटी स्कॅन चाचणीचे दर कमी होणे आवश्यक असल्याचे वैद्यक क्षेत्राचेही म्हणणे आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी सिटी स्कॅनसाठी अवाजवी रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची दखल घेत सिटी स्कॅन तपासणीचे दर कमी करण्याबाबत समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज मंगळवारी एक आदेश जारी करून समिती स्थापन केली.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिव रुग्णालयाच्या रडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. अनघा जोशी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे व जे. जे. रुग्णालय अधिष्ठाता यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात ही समिती सिटी स्कॅनसाठीचे सुधारित दर जाहीर करतील असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

 

अवश्य वाचा