मुंबई 

मागील दोन वर्षांपासून मंदी असलेल्या दुचाकी वाहनांच्या बाजारात करोनामुळे चैतन्य आल्याचे चित्र आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या वापरात मर्यादा आणि करोना संसर्गाचा धोका दोन्ही असल्याने नागरिकांकडून खासगी गाडयांच्या वापरावर भर दिला जात आहे. त्यातही स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून दुचाकी वाहनांची खरेदी होते आहे. 

करोनाचे संकट अद्यापही टळले नसल्याने बसमधून प्रवास करणे धोकादायक आहे, तर रेल्वेतून खासगी नोकरदारांना प्रवासाची मुभा नाही. त्यातच टॅक्सी आणि रिक्षाची सेवा अद्यापही पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी सुरक्षित असा पर्याय म्हणून दुचाकी खरेदीकडे नागरिकांचा ओढा आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आला नसताना दुचाकींची मागणी वाढल्याने या क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.