मुंबई,

 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून, त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता करोनाला हरवून बरे झालेल्यां रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

 राज्यातील 23 वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लॅटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

 यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

 यावेळी मुख्यमंत्री  म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

 आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात, पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवल आहे. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठीप्रयत्न झाले पाहिजे. 10 पैकी 9 रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का? यावार विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.