मुंबई
। मुंबई । वृत्तसंस्था ।
आगामी 2021 च्या तांत्रिक पाच महिन्यांसाठी धरणात तब्बल 91.85 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे आगामी पाच महिन्यांसह जूनपासून सुरू होणार्या नव्या तांत्रिक वर्षारंभालाही कोयनेतील मुबलक पाण्यामुळे सिंचनासह वीजनिर्मितीची कोणतीही चिंता नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.एक जून ते एकतीस मे असा येथील तांत्रिक कालावधी आहे. यापैकी आत्तापर्यंत सात महिन्यांचा कालावधी संपला. या काळात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल सरासरी 2500 मिलीमीटर कमी पाऊस व 110 टीएमसी पाण्याची आवक कमी झाली. तरीही पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने येथे नवीन वर्षारंभाला तुलनात्मक ज्यादा पाणी शिल्लक आहे.
संपलेल्या सात महिन्यांत येथे एकूण 128.70 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. याचवेळी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 27.38 तर पुर्वेकडे सिंचनासाठी 10.50 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. याशिवाय पूरकाळात धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 4.22 टीएमसी तर धरणाच्या दरवाजातून विनावापर 23.99 टीएमसी पाणी सोडून देण्यात आहे.दरवर्षी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते या सात महिन्यांत यापैकी 27.38 टीएमसी पाणी वापर झाल्याने आगामी पाच महिन्यांसाठी तब्बल 40.12 टीएमसी आरक्षीत कोट्यावर आवश्यक व अखंडित वीजपुरवठा होवू शकतो. गेल्या काही वर्षांत सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता सरासरी 36 टीएमसी पाण्याची गरज भासते. आत्तापर्यंत यासाठी 10.50 टीएमसी पाणी वापरले गेल्याने आगामी काळात साधारणपणे 25.50 टीएमसी पाण्याची गरजही भागविणे सहजशक्य आहे.
सध्याचा शिल्लक एकूण 91.85 टीएमसी पाण्याचा विचार केला तर आगामी काळात पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 40.12, पुर्वेकडे सिंचनासाठी 25.50 व मृतसाठा 5 टीएमसी अशा एकूण 70.62 टीएमसी पाण्यानंतरही धरणात आगामी एक जूनपासून सुरू होणार्या नव्या तांत्रिक वर्षारंभाला तब्बल वीसहून अधिक टीएमसी पाणी शिल्लक रहाण्याच्या शक्यता आहेत.