28,227 वयोवृद्ध मतदानासाठी येणार मतदार केंद्रांवर
| रायगड | सुयोग आंग्रे |
रायगड लोकसभा मतदारसंघात वयाची शंभरी पार केलेले 1 हजार 428 मतदार असून 85 वर्षांवरील एकूण 30 हजार 820 मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या देखील 8 हजार 909 आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना घरबसल्या देखील मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्याअनुषंगाने त्यांच्याकडून पर्याय घेण्यात आले. पण, जिल्ह्यातील 85 वर्षांवरील तब्बल 28 हजार 227 वृद्धांनी मतदान केंद्रांवर येऊनच मतदान करणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले. दुसरीकडे 415 दिव्यांग वगळता सर्वजण मतदानासाठी केंद्रांवरच येणार आहेत. त्यामुळे आता 2 हजार 593 मतदार घरुनच मतदान करणार असल्याचे निश्चित झाले आहे. वृद्ध, दिव्यांग मतदार आपला हक्क केंद्रांवर येवून बजावणार आहेत, मग सर्वांनीच निश्चितपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्रामपंचायतींची निवडणूक वगळता 2019 पासून एकही निवडणूक झालेली नाही. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांवर दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच वर्षांनंतर आता लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता असून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने आपल्या नेत्यांचे पारडे तथा राजकीय वजन टिकले पाहिजे, विकासाची कामे करणारा उमेदवार विजयी व्हायला हवा, या हेतूने 85 वर्षांवरील वृद्ध मतदार देखील केंद्रांवर येऊनच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 85 वर्षांवरील प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यापैकी कितीजण घरबसल्या किंवा मतदान केंद्रांवर येऊन मतदान करणार आहेत, याची नोंद घेण्यात आली. त्यानुसार 85 ते 119 वर्षांवरील 28 हजार 227 मतदारांनी आम्ही मतदान केंद्रांवर येऊनच मतदान करणार असल्याचे सांगितले. तर बहुतेक दिव्यांग मतदार देखील मतदानाच्या दिवशी केंद्रांवर येतील अशी स्थिती आहे. ज्या मतदारांना केंद्रांवर यायला वाहनाची सोय नाही, त्यांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठी शासनाकडून वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात गृहमतदानाचा पर्याय 3,008 मतदारांनी निवडला आहे. यामध्ये 2 हजार 593 वयोवृद्ध आणि 415 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. वयोवृद्ध मतदारांमध्ये पेण विधानसभा 511, अलिबाग विधानसभा 228, श्रीवर्धन 431, महाड 294, दापोली 580 आणि गुहागर मतदारसंघातील 549 मतदारांचा समावेश आहे. दिव्यांग मतदारांमध्ये पेण विधानसभा मतदारसंघात 69, अलिबाग 22, श्रीवर्धन 94, महाड 51, दापोली 93 आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील 86 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
गृहमतदान करणारे 85 वर्षांवरील : 2593 दिव्यांग : 415
मतदान केंद्रांवर येऊन मतदान करणारे 85 वर्षांवरील : 28,227 दिव्यांग : 8,494