। रायगड । सुयोग आंग्रे ।
आमच्या विरोधात लढण्याचं धाडस करू नये, आम्ही त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजकीय सभांमध्ये दिला जातो. अनेक बडे-बडे मान्यवर ईर्षेने निवडणूक लढतात, मात्र जनमत त्यांच्या विरोधी असते आणि त्यांना अनामत रक्कम गमवावी लागते. ही रक्कम किती असते, ती कोणत्या परिस्थितीत जप्त केली जाते, पराभव झाला तरी ती परत केली जाते का, याविषयी निवडणूक आयोगाचे स्पष्ट नियम आहेत.
कुणीही उठावं, निवडणुकीचा अर्ज भरावा, लढावं, असं व्हायला नको म्हणून अनामत रक्कम भरण्याची अट लागू करण्यात आली. रोख स्वरुपात ही रक्कम भरता येते. जास्तीत जास्त एक हजार रुपयांची नाणी घ्यावीत, असा नियमदेखील आहे. सन 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर, काही ठिकाणी आम्ही पाचशे लोक मैदानात उतरवणार आहोत. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल, असेही सांगितले जात आहे.
आता एवढ्या सगळ्या लोकांनी प्रत्येकी 25 हजार रुपये किंवा 10 हजार रुपये भरायचे, म्हणजे खायची गोष्ट आहे का? अनुक्रमे सव्वा कोटी आणि 50 लाख एवढी ही रक्कम होते. शिवाय, अपवाद वगळता ती जप्त होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे या रकमेला निवडणुकीत खूप महत्त्व असते. अनेकांकडे कोट्यवधी रुपये असतात, 25 हजार रुपये गेले म्हणून त्यांना फार फरक पडणार नसतो, मात्र डिपॉझिट जप्त ही राजकारणात लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. त्यामुळे भलेभले निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणे पसंत करतात.
लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास डिपॉझिट म्हणून 25 हजार रुपयांची रक्कम भरावी लागते. मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला 12 हजार 500 रुपये डिपॉझिट भरावे लागते. विधानसभा निवडणुकीला या रकमेच्या निम्मी म्हणजे अनुक्रमे 12 हजार 500 आणि सहा हजार रुपये एवढी डिपॉझिट रक्कम भरावी लागते. आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती खुल्या जागेवर निवडणूक लढणार असेल तरी तिला सवलत लागू असते.
तरच परत मिळते डिपॉझिट उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरवला गेला तर… उमेदवाराने उमेदवारी अर्ज वेळेत माघार घेतला तर… मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाला तर… उमेदवाराचा विजय झाला तर… पराभव झाला तरी 1/6 एवढ्या प्रमाणात मते घेतली तर…
असे होते डिपॉझिट जप्त निवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण झालेल्या मतांच्या एक षष्ठांश मतांपेक्षा (झालेल्या मतदानाचा सहावा भाग) एक मत अधिक मिळाले तरी उमेदवाराला डिपॉझिट परत केले जाते. बरोबर एक षष्ठांश मते मिळाली तरी डिपॉझिट जप्त केले जाते.