तिरुअनंतपुरम 

केरळमध्ये एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला उच्च न्यायालयानं गर्भपात करण्यासाठी परवानगी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने पार पडली.

संबंधित बलात्कार पीडित मुलगी ही अवघ्या 14 वर्षांची आहे. तिच्या पोटात 24 आठवड्यांचा गर्भ वाढत होता. पीडित मुलीकडून गर्भपाताची परवानगी मागत एक याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पीडितेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. ए के जयशंकरन नांबियार आणि शाजी पी चेली यांच्या खंडपीठाने मुलीला गर्भपाताची परवानगी दिली. प्रजननासाठी पर्याय निवडण्याचा अधिकार हा अनुच्छेद 21 नुसार वैयक्तिक स्वतंत्रतेचा एक भाग असल्याचं यावेळी न्यायालयाने नमूद केले आहे.

दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिलाय. संबंधित 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांपासून बेपत्ता होती. तिच्यावर बलात्कार करणार्‍या 28 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पीडित मुलगी 24 आठवड्यांची गर्भवती आहे. याचिका दाखल केली तेव्हा गर्भ 20 आठवड्यांचा होता. उल्लेखनीय म्हणजे, बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी देणारी ही काही पहिलीच घटना नाही. याअगोदरही गेल्या वर्षी जुलै महिन्यात मध्य प्रदेश हायकोर्टानंही एका प्रकरणात 13 वर्षांच्या अल्पवयीन बलात्कार पीडितेला 26 आठवड्यांचा गर्भ पाडण्यासाठी परवानगी दिली होती. तर मुंबई उच्च न्यायालयानंही 2018 मध्ये एका बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली होती.

 

अवश्य वाचा