Friday, March 05, 2021 | 07:20 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

दिवस-रात्र कसोटीत गुलाबी विजयाचा टीम इंडियाचा निर्धार
22-Feb-2021 06:27 PM

अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

दिवस-रात्र कसोटीतील कांगारूंविरुद्धच्या दारुण पराभवाच्या स्मृती पुसून टाकायला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सज्ज झाली आहे. गुलाबी चेंडूंवर खेळण्याचा हिंदुस्थानी संघाचा अनुभव तसा चांगला नाहीय. हे लक्षात घेऊन आता हिंदुस्थानच्या संघव्यवस्थापनाने अहमदाबादच्या डे-नाईट कसोटी क्रिकेट लढतीसाठी कसून सराव सुरू केला आहे. त्यासाठी गुलाबी चेंडूंचे उत्पादन करणाऱया एसजी कंपनीकडून टीम इंडियासाठी तब्बल 36 चेंडू मागवण्यात आले आहेत. अहमदाबादचे मोटेरा हे आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तिसऱया कसोटीसाठी फक्त 50 हजार क्रिकेट शौकिनांना स्टेडीयममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर गुलाबी चेंडूची दिवस-रात्र कसोटी लढत खेळवली जाणार आहे. ही लढत जिंकून पाहुण्या इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळेच लढतीसाठी वापरल्या जाणाऱया नवख्या गुलाबी चेंडूनच सराव करण्याचे धोरण यजमान संघाने अवलंबले आहे. यापूर्वी कोलकाताच्या ईडन गार्डनवर झालेल्या हिंदुस्थान आणि बांगलादेश संघातील दिवस-रात्र कसोटी हिंदुस्थानने 1 डाव आणि 46 धावांनी जिंकली होती. या लढतीत कर्णधार विराट कोहलीने 136 धावांची शतकी खेळी साकारली होती. तर वेगवान गोलंदाज इशांत शर्माने लढतीत 9 विकेट घेत ममॅन ऑफ दि मॅचफचा किताब पटकावला होता.पण ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेडवर खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटीत मात्र टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. गुलाबी चेंडूवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हिंदुस्थानी संघाचा पहिला डाव मात्र 36 धावांत गुंडाळला होता.

छत्तीसीचे ते दुःस्वप्न टीम इंडिया आता विसरू पाहत आहे. म्हणूनच लढतीच्या काही दिवस आधी हिंदुस्थानी फलंदाज गुलाबी चेंडूंवर सराव करीत आहेत. गोलंदाजांनाही गुलाबी चेंडूने तुफानी मारा करण्याचा आनंद लुटण्याची संधी अहमदाबादच्या तिसऱया दिवस-रात्र कसोटी लढतीत मिळणार आहे. कोलकाता येथे खेळवण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पहिल्या दिवस-रात्र कसोटीत इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या हुकमी गोलंदाजांनी अफलातून टिच्चून मारा केला होता. अहमदाबाद कसोटीतही त्यांच्याकडून तशीच अपेक्षा संघव्यवस्थापनाला आहे.

एरवी नेहमीच्या दिवसा खेळवल्या जाणाऱया कसोटीत लाल रंगाचा चेंडू वापरला जातो, पण दिवस-रात्र कसोटी अर्धी प्रकाशझोतात खेळवली जात असल्याने फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना चेंडू नीट दिसावा म्हणून त्याला गुलाबी चमकदार रंग देण्यात आला आहे. हा चेंडू बराच काळ कडक राहतो आणि त्याची चमकही बराच काळ टिकते. शिवाय मैदानात खेळपट्टीवर गावात असले तर वेगवान गोलंदाजांचे चेंडू काही वेळा वेगाने सरपटत जात फलंदाजांची भंबेरी उडवतात. तर कधी वेगाने उसळून भल्याभल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवतात. गुलाबी चेंडूवरील अतिरिक्त चमकीमुळे तो पहिली 10 ते 15 षटके जास्त स्विंग होतो. त्यामुळेच आतापर्यंत दिवस- रात्र कसोटीत मोठी धावसंख्या होऊ शकलेली नाही. गुलाबी चेंडूची शिवण गोलंदाजांना त्रासदायक ठरते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top