सिडनी
सलग दुसर्या सामन्यात भारतीय संघावर 51 धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर 390 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 338 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला 390 धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपवलं नाही.
भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने 38 धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
दुसर्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने 89 धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर 76 धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी 2 तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
स्टिव्ह स्मिथचं आक्रमक शतक आणि इतर फलंदाजांनी त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर सलग दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. सिडनीच्या मैदानावर दुसर्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 389 धावांचा डोंगर उभा केला. स्टिव्ह स्मिथने सलग दुसर्या सामन्यात शतक झळकावत 104 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनीही उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी सलग दुसर्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून शमी, बुमराह आणि पांड्याने 1-1 बळी घेतला.
पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू बुमराह आणि शमीची षटकं सावधपणे खेळून काढत फिंच आणि वॉर्नर जोडीने खेळपट्टीवर आपला जम बसवला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने 60 धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 83 धावा केल्या.
यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसर्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. 64 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने स्मिथने 104 धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ शमीकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लाबुशेनने मॅक्सवेलच्या साथीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान लाबुशेनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. 49 व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर 70 धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्याने नाबाद 63 धावा केल्या.