US Open स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत व्हिक्टोरिया अझरेंकाने दमदार पुनरागमन करत सेरेनाचं आव्हान परतवून लावलं. व्हिक्टोरियाने सेरेनावर 1-6, 6-3, 6-3 अशी मात केली. अंतिम फेरीत व्हिक्टोरियासमोर जपानच्या नाओमी ओसाकाचं आव्हान असणार आहे. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीने व्हिक्टोरिया अझरेंकाने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2013 साली सेरेना विल्यम्सनेच व्हिक्टोरियावर अंतिम फेरीत मात केली होती.

ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत व्हिक्टोरियाने सेरेना विल्यम्सवर याआधी कधीच मात केली नव्हती. पहिला सेट 1-6 ने गमावल्यानंतर व्हिक्टोरिया पुनरागमन करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतू दुसर्‍या सेटमध्ये व्हिक्टोरियाने बहारदार खेळ करत सर्वच बाबतीत सेरेनावर मात केली. याआधीही 2012 साली व्हिक्टोरियाला णड जशिप मध्ये तिसर्‍या फेरीत सेरेनाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

2013 साली ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद हे व्हिक्टोरियाचं शेवटचं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं. यानंतर 2016 साली व्हिक्टोरियाने आपल्या बाळाला जन्म दिला. दरम्यान खासगी आयुष्यातील चढ-उतार आणि आपल्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी मधल्या वर्षांमध्ये व्हिक्टोरिया बराच कालावधी टेनिसपासून दूर होती. परंतू या सर्वांवर मात करत तिने यशस्वी पुनरागमन केलं आहे. दरम्यान सेरेनाला आपलं 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी आणखी थोडावेळ वाट पहावी लागणार आहे.

 

अवश्य वाचा