प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अव्वल क्रिकेटपटू रजत भाटियाने बुधवारी सर्व क्रिकेट प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. 2014 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या उंबरठयावर पोहोचणा़-या या दिग्गज खेळाडूने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीबाबतीत काहीही खंत नसल्याचे नमूद केले.

40 वर्षीय रजत भाटियाने 2003-04 हंगामात तामिळनाडूतर्फे पदार्पण केले. पण, नंतर तो प्रदीर्घ काळ दिल्ली संघातर्फे खेळला. 2018-19 मध्ये त्याने नवोदित संघ उत्तराखंडला रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारुन दिली होती. दिल्ली क्रिकेटचा संघ अडचणीत असताना त्यांच्या मदतीला हमखास धावून येणारा खेळाडू, अशी ख्याती त्याने प्रामुख्याने मिळवली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने 112 प्रथमश्रेणी सामन्यात 49.10 च्या सरासरीने 6482 धावा जमवल्या. शिवाय, 27.97 च्या सरासरीने 137 बळी घेतले. याशिवाय त्याने 119 लिस्ट ए व 146 टी-20 सामनेही खेळले. दिल्लीचा जन्म असलेल्या या खेळाडूने मागील हंगामात बांगलादेशमध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळले होते.

मी मागील वर्षीच निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मी येथे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत नव्हतो. नंतर समालोचन सुरु केले. पुढे बांगलादेशमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, कोरोनामुळे तेथे व्यावसायिक खेळाडूंशी करार थांबवले गेले. त्यामुळे, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ ठरते, असे रजतने आपल्या निर्णयाविषयी बोलताना नमूद केले.

रजत भाटिया 2014 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या उंबरठयावर पोहोचला. त्यावेळी टी-20 विश्‍वचषक संभाव्य संघात त्याचा समावेश झाला होता. अर्थात, भारतीय संघात संधी मिळाली नाही, याची खंत वाटत नाही, असे त्याने म्हटले आहे. मी माझ्या कारकिर्दीचा या पद्धतीने विचार करु इच्छित नाही. तसे केल्यास तो माझ्या कारकिर्दीवर मीच केलेला अन्याय ठरेल. जे मानसन्मान माझ्या वाटयाला आले, त्याबद्दल मी समाधानी आहे, असे रजत पुढे म्हणाला.

अवश्य वाचा