संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात येणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या हंगामासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत अमिराती क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशशिर उस्मानी यांनी व्यक्त केले.

आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी काही दिवसांपूर्वी स्पर्धेच्या आयोजनाची तारीख जाहीर केले; परंतु 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान खेळवण्यात येणार्‍या आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी द्यायची की नाही, याविषयी अंतिम निर्णय अमिराती शासन तसेच क्रिकेट मंडळाचा असेल, असेही पटेल यांनी सांगितले होते. शुक्रवारी उस्मानी याविषयी अमिराती क्रिकेट मंडळाची भूमिका मांडली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केंद्र शासनाकडून आयपीएलच्या आयोजनाची परवानगी अद्याप मिळालेली नाही; परंतु आम्ही आमच्या परीने आयपीएल आयोजनाच्या तयारीला प्रारंभ केला आहे. अमिराती शासनाकडे आम्ही स्पर्धेच्या आयोजनाचा अहवाल सुपूर्द केला आहे,असे उस्मानी म्हणाले.

निश्‍चितच आयपीएल ही एक व्यावसायिक स्पर्धा असल्याने या स्पर्धेसाठी येथील प्रेक्षकांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी अमिराती क्रिकेट मंडळ प्रयत्नशील आहे. स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची मुभा द्यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केला आहे. याबाबत त्यांच्याकडून लवकरच उत्तर येईल, अशी आशा आहे, असेही उस्मानी यांनी सांगितले.

2 ऑगस्ट रोजी आयपीएलच्या प्रशासकीय समितीची बैठक रंगणार असून यामध्येच स्पर्धेशी निगडित अनेक निर्णय घेण्यात येण्याचे अपेक्षित आहे. आयपीएलच्या 3-4 आठवडयांपूर्वीच सर्व संघांतील खेळाडू अमिरातीत दाखल होणार आहेत. करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा 2014 नंतर पुन्हा अमिरातीत आयपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे.गतवर्षी आम्ही 14 संघांचा समावेश असलेल्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरींचे आयोजन यशस्वीपणे करून दाखवले. त्यामुळे यंदा आयपीएलच्या आयोजनातसुद्धा आमचे 100 टक्के योगदान देऊ. त्याशिवाय या स्पर्धेच्या आयोजनामुळे अमिरातीला क्रिकेट मंडळाच्या अर्थचक्राला अधिक चालना मिळणार आहे, असेही उस्मानी म्हणाले.

अवश्य वाचा