मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक शांत आणि संयमी फलंदाज होता. मैदानावरील गोष्टी आपल्या विरोधात गेल्या किंवा पंचांनी बाद नसतानाही बाद ठरवले, तरीदेखील सचिनने कधीही आपला राग किंवा रोष कधीही जाहीरपणे व्यक्त केला नाही. पाकचा माजी कर्णधार वसिम अक्रम एकदा म्हणाला होता की सचिनला जर मी डिवचण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं. त्याच पार्श्‍वभूमीवर नुकतेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने सचिन आणि स्लेजिंग याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं.

मैदानावर असताना नयन मोंगिया बडबड करून फलंदाजाला खूप त्रास द्यायचा. तो असं काही बोलायचा, जे चारचौघात सांगता येणार नाही. अजय जाडेजा देखील खूप स्लेजिंग करायचा. तो आमच्या ड्रेसिंग रूममध्ये यायचा, तेव्हा तो आमचा खूप मार खायचा. इंझमाम, मी, रशिद लतीफ आणि वकार युनिस आम्ही त्याला खूप मारायचो. आम्ही सिद्धू आणि विनोद कांबळीला खूप चिडवायचो. पण सचिन आणि अझरूद्दीनला आम्ही कधीही डिवचलं नाही. त्यांच्याविरोधात स्लेजिंग करण्याची कोणाच्यातही हिंमत नव्हती, असे बासित अली म्हणाला.

मैदानावर आम्ही एकमेकांना खूप शिव्याही द्यायचो, पण ते वातावरण वेगळं होते. तसं वातावरण आता दिसणार नाही. कारण ते 90 च्या दशकातले दिवस होते. तेव्हा आम्ही भारत-पाकिस्तानचे खेळाडू सारे एकत्र शॉपिंग करायचो आणि खूप मजा करायचो. आता मात्र तसे दिवस येणं शक्य नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.सचिन अतिशय शांत होता, पण तरीही त्याचा खेळ आक्रमक होता. सचिनला जर मी डिवचण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं. मला तरी सचिनबद्दल असं वाटतं. स्लेजिंगनंतर जेव्हा फलंदाज चिडचिड करतो, रागावतो; तेव्हा फलंदाज शक्य तितकी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळीच फलंदाजाला बाद करण्याची सर्वात जास्त संधी असते. पण सचिनच्या बाबतीत त्याचा काही उपयोग नव्हता, असं अक्रम म्हणाला होता.