यंदा 13 व्या आवृत्तीच्या आयपीएल स्पर्धेची फायनल दोन दिवस उशिराने खेळवली जाईल, असे संकेत आहेत. प्राथमिक रुपरेषेनुसार, यंदाची फायनल 8 नोव्हेंबर रोजी होणे अपेक्षित असून ती त्याऐवजी 10 नोव्हेंबर रोजी घेण्याचा आयपीएल कार्यकारिणीचा विचार असल्याचे समजते. आयपीएलशी संलग्न घटकांना दिवाळीतील आठवडयाचा आणखी उत्तम विनियोग करता यावा, त्याचा लाभ घेता यावा, यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता चर्चेत आहे. या आठवडयाच्या अखेरीस आयपीएल कार्यकारिणीची बैठक होणे अपेक्षित असून त्यात यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास आयपीएलची फायनल रविवारी खेळवली न जाण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.

कार्यकारिणी बैठकीत स्पर्धेची रुपरेषा, क्वारन्टाईनविषयक उपाययोजना, सरावासाठी आवश्यक सुविधा, निवास व प्रवास व्यवस्थेबाबत देखील प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे. भारतीय संघ आयपीएल स्पर्धेनंतर लगोलग ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असल्याने आयपीएलचा कालावधी आणखी वाढवता येणे शक्य नाही, असे बीसीसीआयने यापूर्वी म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, जर आयपीएल फायनल दोन दिवसाने उशिरा, दि. 10 नोव्हेंबर रोजी झाल्यास भारतीय संघातील खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीमधूनच थेट ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यातील पहिल्या लढतीला 3 डिसेंबर रोजी सुरुवात होईल.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन