शारजा

 IPL 2002 आयपीएलचा १३वा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) साठी अतिशय खराब गेला आहे. पहिल्या सात सामन्यापैकी फक्त दोनमध्ये विजय मिळवणाऱ्या चेन्नईने आठव्या सामन्यात कमबॅक केले होते. त्यानंतर काल शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांचा पराभव झाला. चेन्नईने विजयासाठी दिलेले १८० धावांचे लक्ष्य ५ विकेटच्या बदल्यात पार केले. चेन्नईचा स्पर्धेतील हा ९ सामन्यातील सहावा पराभव आहे. असे असले तरी त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते फक्त त्यासाठीची वाट मात्र बिकट झाली आहे. 

चेन्नईने ९ पैकी ६ पराभव आणि ३ विजयांसह ६ गुण मिळवले आहेत. दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अनेकांना वाटले की आता चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. पण परिस्थिती अवघड आहे अशक्य नाही. 

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेकडे अद्याप पाच सामने आहेत. तर त्यांनी चांगली कामगिरी केली तर ते निश्चितपणे प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकतील. 

CSKला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर काय आहे समीकरण

चेन्नईला यापुढे ५ सामने खेळावे लागणार आहेत. हे सामने राजस्थान, मुंबई, बेंगळूरू, कोलकाता आणि पंजाब यांच्याविरुद्ध आहेत. या ५ पैकी ४ सामन्यात जरी त्यांनी विजय मिळवला तरी चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. पण यासाठी एक अट म्हणजे कोलकाताचा त्यांच्या शिल्लक चार सामन्यात आणि राजस्थान व हैदराबादचा त्यांच्या दोन सामन्यात पराभव झाला पाहिजे. 

सध्या दिल्ली कॅपिटल्स १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. ते प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्सकडे १२ गुण असून त्यांचे देखील स्थान निश्चित आहे. कारण शिल्लक ६ पैकी फक्त एका सामन्यातील विजय त्यांना पुरेसा आहे. तिसऱ्या स्थानावर बेंगळुरू असून त्यांचे देखील १२ गुण आहेत. त्यांना शिल्लक ५ पैकी एक सामन्यातील विजय पुरेसा आहे.

आता खरी स्पर्धा आहे ती चौथ्या स्थानासाठी सध्या कोलकाता नाइट रायडर्स या स्थानावर असून त्यासाठी KKR सह हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि पंजाब यांच्यात टक्कर आहे. पंजाब प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य आहे. कारण शिल्लक ६ पैकी पाच सामन्यात ५ विजय मिळवावे लागतील. तर राजस्थान, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नईला १४ गुण मिळवण्यासाठी चार सामन्यात विजय मिळवावा लागेल.