टी-20 विश्‍वचषक 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणार्‍या दोन ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत 2021 आणि 2022च्या टी-20 विश्‍वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2021चा टी-20 विश्‍वचषक भारतातच होणार असून 2022चा टी-20 विश्‍वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे  दिले आहे. याशिवाय 2021मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्‍वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

महिलांचा 2021 एकदिवसीय विश्‍वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-20 विश्‍वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020मध्ये होणारा टी-20 विश्‍वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2021च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला 2021ऐवजी 2022च्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर 2021च्या टी-20 विश्‍वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून 2022चा टी-20 विश्‍वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

वन डे विश्‍वचषकांबद्दलदेखील या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. 2021चा महिला वन डे विश्‍वचषक आता 6 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022मध्ये न्यूझीलंडला आयोजित केला जाणार आहे. तर 2023मध्ये होणारा पुरूषांचा एकदिवसीय विश्‍वचषक पूर्वनियोजित योजनेनुसार भारतात होणार आहे. 2011च्या विश्‍वचषकाचे यजमान भारताबरोबरच श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याकडेही होते, पण 2023चा विश्‍वचषक पूर्णपणे भारतात खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन