नवी दिल्ली

भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे  1 जुलैपासून हैदराबाद येथे सराव शिबिर आयोजित केले गेले असून वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूसह काही दिग्गज खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. अर्थात, या प्रशिक्षण शिबिरासाठी बॅडमिंटन संघटनेला अद्याप तेलंगणा राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.सध्याच्या घडीला काही भारतीय खेळाडू बेंगळूरमधील प्रकाश पदुकोण अकादमीमध्ये सरावही करत आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मागील महिन्याच्या उत्तरार्धात काही नियम शिथिल केल्यानंतर बेंगळुरात या खेळाडूंना ही मुभा मिळाली. हैदराबादमध्ये मात्र अद्याप तेथील अव्वल खेळाडूंना अशी संधी मिळालेली नाही.

यापूर्वी, मार्चमध्ये भारतीय बॅडमिंटन संघटनेने लखनौत आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप लांबणीवर टाकली होती. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार ही स्पर्धा दि. 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणे अपेक्षित होते. कोव्हिड-19 च्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक हंगामातील बॅडमिंटन स्पर्धा किमान सप्टेंबरपर्यंत घेता येणार नाहीत, यावर या शिखर संघटनेने देखील शिक्कामोर्तब केले आहे.भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्थानिक स्पर्धा सुरु करण्याकरिता सर्व राज्यातील सचिवांशी चर्चा केली असून त्यानंतरच सप्टेंबरपर्यंत यातील कोणतीही स्पर्धा घेता येणार नाही, हा निर्णय घेतला आहे, असे संघटनेचे सचिव सिंघानिया यांनी स्पष्ट केले. कोव्हिड-19 ची स्थिती सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा तपासली जाईल आणि त्या परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

 

अवश्य वाचा