अहमदनगर

 काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांचे स्थान काय आहे? मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले. आता मंत्रिपद टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे,फ अशा शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढवला आहे.

 महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीवरून विखे-थोरात यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. थोरात यांनी अलीकडंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ममातोश्रीफ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावरून काँग्रेस एवढी कधीच लाचार नव्हती असा टोला विखे यांनी हाणला होता. थोरात यांनी विखेंच्या या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पाया पडणारा विरोधी पक्षनेता महाराष्ट्रानं पाहिला आहे, अशी बोचरी टीका थोरात यांनी विखेंवर केली होती.

 लोणी येथे आज पत्रकारांशी बोलताना विखे यांनी थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मकोण कोणाच्या पाया पडतो हे पाहणारे थोरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात काय करायचे? भ्रष्टाचाराच्या फाइल काढू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबायचे की भाजपमध्ये घ्या म्हणून विनवणी करायचे यावरही त्यांनी बोलले पाहिजे, असं आव्हान विखे यांनी दिले.