जयपूर  

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरूद्ध उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील गटबाजी शिगेला पोहचली असून दोन्ही बाजू आपापल्या म्हणण्यांवर अद्यापी ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे सावटही कायम आहे. गेहलोत यांनी काँगेसच्या विधिमंडळ पक्षाने पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. मात्र या बैठकीवर पायलट यांच्या समर्थक आमदारांनी बहिष्कार टाकला होता.

दोन्ही बाजू आपल्याकडे पुरेसे आमदार असल्याचा दावा करीत आहेत. गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सरकारला एकंदर 106 आमदारांचे समर्थन असून सरकारला कोणताही धोका नाही. तथापि, पायलट यांनी दिल्लीतून गेहलोत यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले. आपल्याला काँगेसच्या 30 आमदारांचे समर्थन असून त्यापैकी 25 आमदार सध्या आपल्यासह दिल्लीत आहेत. आणखी काही अपक्षही आमच्यासोबत आहेत, असा रविवारचा दावा सोमवारी त्यांनी पुन्हा केला.

पायलट यांना काँगेस शेवटची संधी द्यावयास तयार आहे. मात्र, त्यांनी बंड मागे घेऊन सरकारसोबत राहिले पाहिजे. त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा काँगेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिला. आपला भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही. मात्र काँगेसमध्येही अवमान खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया पायलट यांनी व्यक्ती केली. सोमवारी जयपूर येथे झालेल्या काँगेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर संमत करण्यात आलेल्या प्रस्तावात पायलट यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली होती. पक्ष कमजोर करणाऱया प्रत्येक नेत्याचा आणि प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो, असे प्रस्तावात नमूद आहे. त्यामुळे पायलट यांना शेवटची संधी देण्याची भाषा काँगेस नेतृत्व करीत असले तरी त्यांना यापुढे पक्षात फारसे महत्व दिले जाणार नाही, असे दिसून येते. त्यामुळे पायलट आणि काँगेस यांच्यात न भरून येणारी दरी निर्माण झाल्याचीही चर्चा आहे. एकंदर, पायलट पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.