नवी दिल्ली 

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून 23.9 टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. त्याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा आकडाही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदी मेड डिझास्टर म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटे असं म्हणत देशासमोर सहा समस्यांची यादीच पोस्ट केली आहे.

भारत मोदी मेड डिझास्टरखाली दाबला गेला आहे, या शिर्षकाखाली राहुल गांधी यांनी सहा वेगवेगळ्या समस्यांची यादी ट्विट केली आहे. यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा उणे 23.9 टक्क्यांनी आक्रसलेला जीडीपीचा दर, दुसरा मुद्दा 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, तिसरा मुद्दा 12 कोटी लोकांचा रोजगार बुडणे, चौथा मुद्दा केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, पाचवा मुद्दा करोनाबाधितांच्या आकड्यात आणि मृत्यूमध्ये दैनंदिन पातळीवर सर्वात मोठी जागतिक वाढ भारतात असणे आणि सहावा मुद्दा भारताच्या सीमावर शेजारच्या देशांनी कुरघोड्या करण्याचा असल्याचे म्हटले आहे.

जीडीपीसंदर्भातील आकडेवारी समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी यासंदर्भातील इशारा आपण पूर्वीच दिला होता हे सांगणारा एक जुना व्हिडिओ ट्विट केला होता. मार्च 2017 रोजी राहुल गांधी यांनी येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा हाच जुना व्हिडीओ राहुल यांनी 31 ऑगस्ट रोजी ट्विट केला आहे. त्याचबरोबर जीडीपी 24 टक्क्यांनी कोसळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक इशार्‍याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाणं खूप दुर्दैवी आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

जीडीपीसंदर्भातील आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली असून भाजपाच्या काही नेत्यांनी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील अर्थव्यवस्थाही अशाच प्रकारे नकारात्मक आकडेवारीतच असल्याचे म्हटले आहे.

अवश्य वाचा